गणेशोत्सवात सुरक्षेसाठी उपाययोजना करणार

शेकापच्या मानसी म्हात्रे यांच्या सूचनांची प्रशासनाकडून दखल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गणेशोत्सवाच्या निमित्ताने महामार्गावर लावण्यात येणार्‍या फलकांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. अलिबाग स्थानकात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. महिला सुरक्षेच्या दृष्टीने गस्त वाढविण्यात आली आहे. शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख तथा जिल्हा शांतता कमिटी सदस्या अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केलेल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली आहे. त्याची कार्यवाहीदेखील सुरु झाली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या मंडळींकडून स्वतःचे फलक लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी हे फलक लावण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत. प्रमाणापेक्षा मोठे फलक लावले जातात. यावर बंदी आणणे आवश्यक आहे. त्या फलकाद्वारे दुसर्‍या गटाला अपमानित करणारे वाक्य असल्याने त्यातूनही अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दोन-चार मार्ग एकत्र आलेले असतात. त्याच मार्गावर शुभेच्छांचा भला मोठा फलक लावला जातो. त्यामुळे चालकांचे लक्ष वेधून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे फलक काढले पाहिजे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पेपासून महाडपर्यंत प्रशासनाकडून सुविधा केंद्र निर्माण केली आहेत. परंतु, जलवाहतुकीद्वारे मुंबईकडून अलिबागकडे येणार्‍या प्रवाशांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. अलिबागमधून मुरूड, श्रीवर्धनकडे जाणारे प्रवासी अधिक आहेत. या सर्व प्रवाशांचा ताण अलिबाग एसटी स्थानकावर येतो. स्थानकात काही सुविधा प्राप्त होत नाही. त्यामुळे महामार्गाप्रमाणे अलिबागमध्ये शहरातील बस स्थानकात सुविधा केंद्र उभारण्यात यावेत, अशी सूचना अ‍ॅड. म्हात्रे यांनी केली होती. त्याची दखल घेत अलिबाग बसस्थानकात हिरकणी कक्ष, ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षा कक्ष, वैद्यकीय सुविधा कक्ष सोयी-सुविधांसह केंद्र उभारण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात 292 गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. कार्यक्रम पाहण्यासाठी महिला, मुली, तरुणींची रात्रीच्या वेळी रस्त्यावरून वर्दळ असते. त्यामुळे महिलांचे मंगळसूत्र खेचून नेणे, तसेच अत्याचार होण्याची भीती आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना म्हणून महिला पोलीस पथके तालुका स्तरावर तयार करून त्या माध्यमातून गस्त वाढविणे, अशा अनेक सूचना अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी प्रशासनाकडे केल्या. त्यांच्या मागणीची दखल घेत अलिबाग स्थानकात सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असून, अन्यदेखील सूचनांची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.

Exit mobile version