उरणच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट

इंदोर येथील राष्ट्रीय स्पर्धेत नऊ सुवर्णपदकांची कमाई
| उरण | वार्ताहर |

मध्यप्रदेश, इंदौर येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी जलतरण स्पर्धांमधून नऊ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यामुळे स्पर्धेत उरणच्या या तीन स्पर्धकांचा स्पर्धेत दबदबा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. या तीनही यशस्वी स्पर्धकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संयुक्त भारतीय खेल फाऊंडेशनच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील इंदौर येथे सातव्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात आले होते. 17 ते 19 सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये अथलेटिक्स, जलतरण, व्हॉलीबॉल, कबड्डी, तायक्वांदो, कराटे, मार्शल आर्ट, डाँसिंग, योगा, चेस, कॅरम, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिनटन, बास्केटबॉल, टेबलटेनिस, स्केटिंग, लॉन टेनिस, आरचारी, हॅन्डबॉल, बॉक्सिंग, रेसीलिंग, पायावर लिफ्टिंग, बॉडिबिल्डिंग अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमधील जलतरण स्पर्धेमध्ये उरणमधील हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश मोडखरकर आणि जयदीप सिंग यांनी सहभाग घेतला होता.

गोल्डन इंटरनॅशनल स्कूलच्या जलतरण तलावामध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये आर्यन मोडखरकर याने 50 मी बटरफ्लाय स्ट्रोक, 50 मी फ्रिस्टाईल आणि 100 मी फ्रिस्टाईल या तीन स्पर्धा खेळून तीनही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. हितेश भोईर याने 50 मी फ्रिस्टाईल, 100 मी फ्रिस्टाईल आणि 100 मी बॅक्स्ट्रोक या प्रकारांमध्ये तीन सुवर्ण पदक मिळवली असून, तर जयदीप सिंगनेही 50 मी फ्रिस्टाईल, 50 ब्रेस्टस्ट्रोक, 100 ब्रेस्टस्ट्रोक या तीन प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
यामुळे उरणच्या या तीन स्पर्धकांचे राष्ट्रीय स्पर्धेमधील जलतरण स्पर्धेवर वर्चस्व राहिले आहे. तीन स्पर्धकांनी 9 सुवर्ण पदकांची लयलूट केल्याने या स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या यशस्वी तीन ही स्पर्धकांचे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version