पदकविजेते वैदर्भीय खेळाडू होणार मालामाल

ओजस अडीच कोटींचा धनी

| नागपूर | वृत्तसंस्था ।

चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला नावलौकिक मिळवून देणारे वैदर्भीय खेळाडू आता मालामाल होणार आहेत. राज्य शासनाने या स्पर्धेत सहभागी महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना भरघोस रोख पुरस्कारांची घोषणा केली असून, लवकरच त्यांना ही पुरस्कार राशी मिळणार आहे.

राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार रकमेत यंदा विक्रमी दहापटीने वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. चीनमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूस आता 1 कोटी रुपये, मार्गदर्शकास 10 लाख, रौप्यपदकविजेत्या खेळाडूला 75 लाख रुपये व मार्गदर्शकास साडेसात लाख रुपये, तर कांस्य पदकविजेत्या खेळाडूस 50 लाख रुपये व मार्गदर्शकास 5 लाख रुपये रोख मिळणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही प्रोत्साहनपर 10 लाख रुपये देण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला 10 लाख, रौप्यपदकासाठी 7.5 लाख आणि कांस्य पदकविजेत्याला केवळ 5 लाख रुपये मिळत होते.

शासनाच्या या निर्णयाचा फायदा विदर्भातील पाच युवा खेळाडूंना मिळणार आहे. आशियाई स्पर्धेत सर्वाधिक तीन पदकांची कमाई करणाऱ्या ओजस देवतळेला तब्बल अडीच कोटींची घसघशीत राशी मिळणार आहे. 21 वर्षीय ओजसने कम्पाउंड प्रकारातील वैयक्तिक, सांघिक आणि मिश्र दुहेरीत तीन सुवर्णपदके जिंकली होती. याच स्पर्धेत तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा ओजसचा वैदर्भीय सहकारी बुलडाण्याच्या प्रथमेश जवकारलाही 75 लाख रुपये मिळणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा विदर्भाचा यष्टीरक्षक व मूळ अमरावतीकर असलेल्या जितेश शर्मालादेखील 75 लाख रुपये दिले जाणार आहे. जितेशचा समावेश असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आशियाई स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकले होते.

महाराष्ट्र सरकारने यंदा बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ केली असली तरी, अन्य राज्यांच्या तुलनेत ही पुरस्कार राशी कमीच आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात थोडी नाराजीही आहे. उल्लेखनीय म्हणजे, हरियानामध्ये आशियाई सुवर्णपदक विजेत्यास तीन कोटी, रौप्यपदक विजेत्यास दीड कोटी, तर कांस्य पदक जिंकणाऱ्याला 75 लाख रुपये मिळणार आहे. पंजाब, दिल्ली, तेलंगणा व मध्यप्रदेशसारखे राज्यही या बाबतीत आघाडीवर आहेत.

महिला खेळाडूही लखपती
बक्षीस मिळविणाऱ्यांमध्ये वैदर्भीय महिला खेळाडूही मागे नाहीत. आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सिया देवधरलाही स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रत्येकी दहा लाख रुपये मिळणार आहे. मालविकाने सांघिक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र तिला स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. तर सियाने 3 इन 3 या बास्केटबॉल क्रीडा प्रकारात भाग घेतला होता.

Exit mobile version