वकिलांसाठी मेडीएशन प्रशिक्षण सुरु

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा विधिसेवा प्राधिकारण रायगड-अलिबागच्या वतीने जिल्ह्यातील वकिलांसाठी 40 तासाचे (पाच दिवस) मेडीएशन प्रशिक्षण आयोजित केले. जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश माणगाव व प्रशिक्षक एस. टी. भालेराव यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. अलिबागमध्ये सन्मान हॉटेलमधील सभागृहात हे शिबीर घेण्यात आले आहे.

याप्रसंगी रायगड जिल्हा विधिसेवा प्राधिकारणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून प्रशिक्षण वकिलांसाठी कसे उपयुक्त आहे याची माहिती दिली. रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी मेडीएशनचे महत्व सांगताना मेडिएशनमुळे वादातील पक्षकारांना लवकर वादाचे निराकारण करता येते. त्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा वाचतोच शिवाय न्यायालयाला जटील प्रकरणात पुरेसा वेळ देता येतो. न्यायालयावरील प्रकरणांचे ओझे कमी होण्यास मदत होते असे सांगितले. पुर्वी मेडीएशन प्रशिक्षणासाठी ठाणे येथे जावे लागत होते. परंतु, हे प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल ॲड. प्रसाद पाटील यांनी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे आभार मानले.

जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश माणगाव एस. टी. भालेराव यांनी अध्यक्षीय भाषण करताना जास्तीत जास्त वकील व पक्षकारापर्यंत मेडिएशनचे फायदे पोहोचवण्याचे आवाहन करुन मेडीएशनद्वारे वाद सोडवताना काय करावे लागते, कशी परिस्थिती हाताळावी लागते त्याची थोडक्यात माहिती दिली.
पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश, एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव, आणि न्यायाधीश नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई एम.आर.जाधव हे मेडीएशनचे प्रशिक्षण देणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बार असोसिएशनचे खजिनदार ॲड. राजेंद्र माळी यांनी केले. माणगाव येथील जेष्ठ वकील विनोद घायाळ यांनी आभार व्यक्त केले. यावेळी वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. अनंत पाटील, सचिव ॲड. अमित देशमुख, जिल्हा न्यायालयाचे व्यवस्थापाक महेश दायमा आदी मान्यवर व 40 हन अधिक वकील उपस्थित होते.

Exit mobile version