| दीपक पवार, |विटा |
रायगड जिल्ह्याच्या शेतकरी कामगार पक्षांच्या झुंजार नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षाच्या मार्गदर्शिका हरपल्या. मीनाक्षीताईंचा सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील बलवडीकरांशी 40 वर्षांपासून असलेला ऋणानुबंध संपुष्टात आला. मीनाक्षीताई अन् बलवडीतील कार्यकर्त्यांशी असलेले अनोखे नाते काळाच्या पडद्याआड गेल्याने सामान्य कार्यकर्त्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्यातील बलवडी हे येरळा नदीकाठावर वसलेले गाव. भाई गोविंदराव पवार हे शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. गावातील बी.डी. कुंभार हे पन्नास वर्षांपूर्वी अलिबाग येथे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले अन् दत्ता पाटील, नारायण नागू पाटील यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. मीनाक्षीताई, भाई जयंत पाटील, पंडितशेठ हे बी.डी. सरांचे विद्यार्थी. शाळेत असताना त्यांना गणिताचे धडे दिले. तेव्हापासून बी.डी. सरांशी गुरू-शिष्याचे नाते अखंडपणे जपले. बी.डी. कुंभार यांच्या कन्या सविता यांच्या विवाह सोहळ्यास राज्याचे राज्यमंत्री असतानाही त्या आल्या. ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या राज्यमंत्री असताना बलवडी ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी राज्य शासनाच्या वैज्ञानिक विकास महामंडळातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मीनाक्षीताईंच्या सहकार्याने इमारत उभी राहिली. अशा अनेक कामांमध्ये त्यांनी सढळ हाताने मदत केली. 1986 साली येरळा नदीपात्रात लोकसहभागातून बळिराजा स्मृती धरणाची निर्मिती होत होती. त्या कामांमध्ये त्यांनी काम केले.
पतंगराव कदम यांच्याशी अनोखं नातं रायगड जिल्ह्यातील शेकापचे पाटील कुटुंबिय अन् पतंगराव कदम यांचे अनोखं नाते होते. याची प्रचिती वेळोवेळी आली आहे. वर्ष होतं 1999. राज्यात भाजप-शिवसेना यांचे सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आलेले. सांगली जिल्ह्यातून काँग्रेसतर्फे पतंगराव कदम यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागलेली. त्याचवेळी शेकापच्या कोट्यातून मीनाक्षीताईंची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागलेली. तेव्हापासून पतंगराव कदम यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. आठ वर्षांपासून पतंगरावांचे अकाली निधन झाले, तेव्हा मीनाक्षीताई तब्येत ठीक नसतानाही पतंगराव कदम यांच्या जन्मगावी सोनसळ आल्या होत्या. बंधू मोहनराव कदम, विश्वजीत कदम यांना धीर दिला होता. कदम-पाटील यांच्यातील कौटुंबिक जिव्हाळा जपणार्या मीनाक्षी पाटील यांचे निधन अस्वस्थ करणारे आहे.