खोपोलीत शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या आयोजनासाठी बैठक

। खोपोली । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचा दरवर्षी दिनांक 2 ऑगस्ट रोजी होणारा वर्धापन दिन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द केला गेला होता, परंतु यंदा वडखळ येथे होणाऱ्या वर्धापन दिनाच्या जंगी आयोजनाच्या निमित्ताने जिल्हा चिटणीस मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे दिनांक 18 जुलै रोजी शेकापचे सर्व नेते खोपोलीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल होणार आहेत. त्या अनुषंगाने खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज श्री समर्थ मंगल कार्यालय खोपोली येथे संपन्न झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झालेल्या वर्धापन दिनाचे कार्यक्रम आणि पक्ष कार्यकर्त्यांची एकत्रित अशी कोणती सभा न झाल्यामुळे मनावर आलेली मरगळ दूर करण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात साजरा करायचा हेतू डोळ्यासमोर ठेवून, कशा पद्धतीने खोपोलीकरांनी या आयोजनात भाग घ्यायचा यासंबंधी चर्चा आणि विचार विनिमय करण्याकरिता खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, जिल्हा नेते किशोर पाटील, संतोष जंगम, शाम कांबळे, अविनाश तावडे, दिलीप जाधव, कैलास गायकवाड, रवी रोकडे, अरूण पुरी, भूषण कडव इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित केली होती. वर्धापन दिनाचे संबंधात मार्गदर्शन करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नीलिमा पाटील आणि जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक 18 जुलै रोजी खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Exit mobile version