। नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील नेरळ रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेला बांधण्यात येत असलेल्या नवीन पदाचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री मेगा ब्लोक घेण्यात येत आहे. नवीन पादचारी पुलावरील गर्डर टाकण्याचे कामासाठी हा मेगा ब्लॉक मध्यरात्री घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील बदलापूर येथे सार्वजनिक पादचारी पूल बंद करण्यासाठी आणि नेरळ येथे पादचारी पूलाचे गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे मुंबई विभागात 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी (शनिवार/रविवार मध्यरात्री) या दोन्ही ठिकाणी संबंधित कामे केली जाणार आहेत. त्यात रोड क्रेनच्या सहाय्याने बदलापूर येथील सार्वजनिक पादचारी पूलाचे डी लॉंचींग केले जाणार आहे.त्याचवेळी याच कालावधीत नेरळ स्थानकातील फूट ओव्हर ब्रिज साठी गर्डर लॉन्च करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉक मुळे अंबरनाथ – वांगणी अप आणि डाउन मार्गावर मध्यरात्री ०१.२५ ते ०३.५५ पर्यंत (२ तास 30 मिनिटे) एवढा ब्लॉक असणार आहे. तर वांगणी – भिवपुरी रोड अप आणि डाउन मार्गावर मध्यरात्री ०१.४० ते ०३.३० (एक तास ५० मिनिटे) एवढा ब्लॉक असणार आहे.
या मेगा ब्लॉक मुळे रात्रीच्या वेळी धावणाऱ्या गाड्यांची स्थिती बदलली आहे.त्यात उपनगरीय लोकल पैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी ००.२४ वाजता सुटणारी लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. तसेच कर्जत येथून ०२.३३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल अंबरनाथ येथून चालविण्यात येईल.तर अप एक्सप्रेस गाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येतील.त्यात 11020 भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्सप्रेस, 12702 हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस,18519 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या पनवेल मार्गे वळविण्यात येणार आहेत.त्याचवेळी कल्याणला जाणार्या प्रवाशांसाठी पनवेल आणि दिवा येथे या गाड्यांना थांबा दिला जाईल आणि त्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानी पोहोचतील.तर रेल्वेचे नियमन मध्ये 11140 गदग- मुंबई एक्स्प्रेसचे नियमन वांगणी येथे केले जाईल आणि निर्धारित वेळेच्या १५ ते २० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानी पोहोचेल.