आजपासून सकाळी दोन, दुपारी दोन तास वाहतूक बंद; कोलाड पुई येथील पुलाला गर्डर बसविण्याचे काम
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यात या मार्गावरील दगडी पूल जीर्ण झाला असून, महामार्गावरील कोलाड पुई येथील महिसदरा नदी पात्रावर नवीन पुलाचे गर्डर बसविण्याचे काम होणार असल्याने दि. 11 ते 13 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 व दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, सर्व प्रकारची वाहतूक या ठिकाणांहून बंद राहणार आहे. या मार्गावर धावणार्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले असून, त्याचा वापर वाहन चालक यांनी करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कल्याण टोल इन्फा. कंपनीतर्फे पुई येथील म्हैसदरा नवीन ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम दि. 11 ते 13 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 व दुपारी 2 ते 4 दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजित कामाच्या वेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावरील सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक कोलाड-रोहा भिसे खिंड मार्गे नागोठणे पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. दुसरा पर्यायी मार्ग वाकण फाटा येथून पाली-रवाळजे कोलाड किंवा पाली रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 या मार्गावरून मार्गस्थ करता येणार आहे, असे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.