रस्त्याच्या वादातून सरपंचावर सदस्याचा हल्ला

| नेरळ | प्रतिनिधी |

कोल्हारे ग्रामपंचायतीमधील रस्त्याच्या बांधकामाबाबत नोटीस का बजावली यावरून चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्याकडून सरपंचांवर हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्यात जखमी झालेले सरपंच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या हल्ल्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ला करणार्‍या सदस्यासह अन्य एकास पोलिसांनी अटक केली आहे.

कोल्हारे ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा 31 मे रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या मीटिंग हॉल आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभा संपल्यावर सरपंच महेश विरले हे त्यांच्या केबिनमध्ये पोहोचले. तेथे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे एका रस्त्याच्या कामाबद्दल चर्चा करण्यासाठी पोहोचले. रस्त्याच्या बांधकामाबद्दल नोटीस का काढल्या, असा प्रश्‍न विजय हजारे यांनी उपस्थित केला. त्यानंतर चर्चेतून सरपंच आणि सदस्य यांच्यात शाब्दिक वाद झाले आणि नंतर विजय हजारे यांनी सरपंच महेश विरले यांना शिवीगाळ केली. त्यावेळी विजय हजारे हे सरपंच विरले यांना जीवेठार मारण्याची धमकी देत होते. त्यावेळी तुला खल्लास केल्याशिवाय सोडणार नाही असे बोलून विजय हजारे तसेच दिव्यांसू चंद्रकांत हजारे, चंद्रकांत रामचंद्र हजारे आणि रामचंद्र हजारे यांनी लाकडी दांडक्यानी सरपंच महेश विरले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी हा वाद मिटविण्यासाठी पुढे गेलेले काही व्यक्तीदेखील या मारहाणीत जखमी झाले. या मारहाणीत जखमी झालेले सरपंच महेश विरले यांना तात्काळ बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले.

जखमी सरपंच विरले यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांची तक्रार बदलापूर येथे रुग्णालयात जाऊन घेण्यात आली. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादी सरपंच महेश सुरेश विरले यांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे, दिव्यांसू चंद्रकांत हजारे,चंद्रकांत रामचंद्र हजारे आणि रामचंद्र हजारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नेरळ पोलिसांनी प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील आरोपी विजय हजारे आणि चंद्रकांत हजारे यांना तात्काळ अटक केली आहे. तर, या गुन्ह्यातील अन्य आरोपी रामचंद्र हजारे हे वयाने 80 वर्षांचे असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही, तर चौथा आरोपी 18 वर्षांखालील आहे.

Exit mobile version