वन जमिनीवरील अतिक्रमण नडले
| अलिबाग | प्रतिनिधी |
शिंदे गटाचे वैजाळी हाशिवरे ग्रामपंचायत सदस्य विजय गावंड यांनी वन जमिनीवर अतिक्रमण करुन तिथे घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे असे आदेश अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश जे. एस. कोकाटे यांनी दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने अलिबागमधील शिंदे गटाला दणका मिळाला आहे.
शिंदे गटाच्या सदस्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते शशिकांत ठाकूर यांनी याचिका दाखल केली होती. डिसेंबर 2022 मध्ये वैजाली हाशिवरे ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिंदे गटाचे कार्यकर्ते विजय गावंड निवडून आले होते.गावंड यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केले असून, त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते शशिकांत ठाकूर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने ॲड. प्रशांत कुचेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या साक्षीपुराव्यांनुसार गावंड यांनी वन अतिक्रमण करुन त्यावर घराचे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार न्यायाधीश जे. एस. कोकाटे यांनी गावंड यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.
ठाकूर यांनी दिलेल्या कायदेशीर लढाईबाबत त्यांचे व ॲड. कुचेकर यांचे अलिबाग शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, कमलेश खरवले, रुपेश जामकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.