मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली

महिना उलटून गेला तरी पाणीच नाही

| दिघी | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील मेंदडी गाव आजही तहानलेले आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे म्हणून हर घर जल योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मेंदडी आदिवासी वाडीवर येथील कोणत्याच योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्याने, या योजनेतून नक्की अधिकार्‍यांना फायदा झाला की कंत्राटदाराला, हा प्रश्‍न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

दिघी-पुणे महामार्गाची निर्मिती झालेल्या मार्गावरच हे गाव आहे. या मेंदडी आदिवासी वाडीवर साधारण 86 कुटुंबांतील 367 लोक राहातात. पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासी वाडीवर पाणीटंचाई सुरू झाली आहे. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहचत नसल्याने नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात दूरदृष्टी ठेवून विविध विकासकामे करण्यात आली. आजही येथील जनतेला ते वरदान ठरत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांचा योजना राबवण्यात आल्या. मात्र, या आदिवासीवाडी शेजारी एक धरण असून, या धरणाचे पाणी आदिवासी बांधवांना मिळत नाही. वेळोवेळी पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यापासून तहानलेले आहेत. शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली तरी विकासापासून येथील नागरिक कोसो दूर आहेत.

हर घर जल कसे पोहोचणार?
येथील सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी असून, स्वदेश फाऊंडेशनमार्फत खोदण्यात आलेल्या दोन बोअरवेल बिघाड होऊन बंद अवस्थेत आहे. जलजीवन योजनेचे रखडलेले काम अपूर्ण असल्याने सध्या या गावात पाणी नाही. त्यामुळे ग्रामस्थ रानातील झर्‍यातून पाणी आणून पितात. अशाने येथील पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी दूर करणे प्रशासनाला आव्हानात्मक आहे. दरवर्षीच्या परंपरेनुसार राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा क्षुल्लक कारणांमुळे मेंदडी आदिवासी वाडीवरील पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे.
चार योजनांतून हंडाभर पाणी नाही
शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), कृषी विभागाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, अशा योजनाचा फारसा फरक तालुक्यातील गावांना पडला नाही. तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात जल संधारण तसेच जल संवर्धन सारख्या कायम व दूरदृष्टी उपायांची गरज आहे. प्रशासन बोअरवेल व विंधन विहिरी प्रस्तावित करण्याचे कागद घोडे नाचवते. कधी कधी विंधन विहिरीस पाणी न लागल्याने खर्च ही वाया जातो. याच चित्र सद्या मेंदडी आदिवासी वाडीवर दिसत आहे.

गेल्या महिन्यापासून गावात पिण्यासाठी पाणी नाही. पाणी समस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे दिवसाची मजुरी बुडते. पाण्याच्या समस्येसाठी संपर्क करण्यात आला. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही.

काशिनाथ वाघमारे, रहिवासी मेंदडी.

मेंदडी आदिवासी वाडीवरील पाण्याची समस्या असल्याची माहिती ग्रामपंचायतीपर्यंत आली नाही. माहिती घेऊन समस्या सोडवण्यात येईल.

राजश्री कांबळे, मेंदडी सरपंच
Exit mobile version