‘मेंटरसारथी‌’ची गरुडझेप !


विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे मार्गदर्शन मिळणार

| माणगाव | प्रतिनिधी |

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये बहरलेल्या ‌‘मेंटरसारथी‌’ या नाविन्यपूर्ण स्टार्टअपने स्टार्टअप विश्वात मानाचा तुरा खोवला आहे. नवउद्योजकांना आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्या या स्टार्टअपने आयएफसीआय व्हेंचर कॅपिटल फंडकडून ‌‘असीम‌’ योजनेअंतर्गत तब्बल 30 लाख रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण विद्यापीठ परिसरातून ‌‘मेंटरसारथी‌’च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यातील वाटचाल आयएफसीआयच्या ‌‘असीम‌’ योजनेअंतर्गत मिळालेल्या या निधीमुळे ‌‘मेंटरसारथी‌’ आता अधिक वेगाने विस्तरेल. लवकरच हे स्टार्टअप आपले अद्ययावत एआय मॉडेल लाँच करणार असून, यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना घरी बसून जागतिक दर्जाचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना डिजिटल पंख देणाऱ्या या उपक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा भक्कम आधार लाभला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरने विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या यशात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए.पी. शेष, इनक्युबेशन संचालक डॉ. संजय नलबलवार आणि इनक्युबेशन सेंटरचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाच्या प्रवासात इनक्युबेशन सेंटरचे माजी सीईओ डॉ. नविन खंडारे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाचाही या यशात मोठा वाटा आहे. त्याचबरोबर या स्टार्टच्या जडणघडणीत प्रेम उभाड, ऋषभ शर्मा, अनिकेत वांढेकर, प्रथमेश भोईर आणि आदित्य संसोळे या ऊर्जावान युवा टीमचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. रात्रंदिवस मेहनत करून या टीमने हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

काय आहे मेंटरसारथी?
‌‘मेंटरसारथी‌’ हे एक आधुनिक डिजिटल व्यासपीठ आहे, जे तरुणांना करिअर, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांशी जोडते. सह-संस्थापक श्रवण पाटील (सीईओ) आणि अमन उचितकर (सीटीओ) यांच्या कल्पनेतून साकारलेले हे व्यासपीठ आज शेकडो विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवत आहे. ही 30 लाखांची गुंतवणूक स्टार्टअपच्या तंत्रज्ञान विकासासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून स्मार्ट मेंटरशिप अधिक प्रभावी करण्यासाठी वापरली जाणार आहे.


तंत्रज्ञानाच्या मदतीने खऱ्या अर्थाने भारताला विश्वगुरु बनवण्याच्या दिशेने हे आमचे छोटेसे पाऊल आहे. मिळालेल्या निधीतून आम्ही आमचे प्लॅटफॉर्म अधिक स्मार्ट आणि विद्यार्थी केंद्रित बनवणार आहोत.
अमन उचितकर, सह-संस्थापक व सीटीओ

Exit mobile version