| मुंबई | प्रतिनिधी |
कफ परेड-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो 3’ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना तिकीट दरात सवलत देण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) घेतला होता. त्यानुसार रविवारपासून अपंगांना तिकीट दरात 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय लागू करण्यात आला. अपंगांना ‘मेट्रोकनेक्ट -3’ (-3) या ॲपचा वापर करत या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
अपंगांना एसटी आणि बेस्ट बसमध्ये तिकीट सवलत आहे. तर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेत 80 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला तिकिट दरात 75 टक्के, तर त्यांच्या मदतनीसाला तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येते. ‘घाटकोपर अंधेरी-वर्सोवा मेट्रो 1’ मार्गिकेसह ‘दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ’ आणि ‘दहिसर-गुंदवली मेट्रो 7’ मार्गिकांवरही अपंगांना तिकिट दरात सवलत देण्यात येते. मात्र ‘मेट्रो 3’ मार्गिकेवर अद्याप अशी सवलत लागू केलेली नाही. त्यामुळे अपंगांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘मेट्रो 3’ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या अपंगांना तिकिट दरात सवलत देण्याची मागणी केली. ही मागणी विचारात घेऊन येत्या 10 दिवसांमध्ये दिव्यांगांना तिकीट दरात 25 टक्के सवलत देण्याचे एमएमआरसीने 28 ऑक्टोबर रोजी ‘एक्स’च्या माध्यमातून जाहीर केले.







