| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. 1 वर शुक्रवार, दि.17 पासून मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
दि.17 रोजी पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान दुपारी 3.00 वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री 10.00 वाजता असणार आहे. तर दि.18 पासून पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी 06.00 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10.00 वाजता होणार आहे. सदर मार्ग क्र.1 वर दर 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर हे अंतरानुसार 0 ते 2 किमीच्या टप्प्याकरिता रु. 10/-, 2 ते 4 किमीकरिता रु. 15/-, 4 ते 6 किमीकरिता रु. 20/-, 6 ते 8 किमीकरिता रु. 25/-, 8 ते 10 किमीकरिता रु. 30/- आणि 10 किमीपुढील अंतराकरिता रु. 40/-. सर्व नवी मुंबईकरांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी नवी मुंबई मेट्रोच्या या वातानुकूलित, आरामदायी व निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घेऊन परवडणाऱ्या दरात सुखकर प्रवास करावा, असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो दि.17 पासून नवी मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. याबद्दल नवी मुंबईकरांचे हार्दिक अभिनंदन. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी औपचारिक उद्घाटनाची वाट न बघता तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. त्यानुसार दि.17 पासून मेट्रो सेवेला प्रारंभ होत आहे, याबद्दल सिडकोचे अभिनंदन आणि नवी मुंबईकरांना शुभेच्छा.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र.1 वरील बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे.
अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको