| मुंबई | प्रतिनिधी |
तुम्ही एक भुजबळ पाडला, तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. ओबीसी समाजाची भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळांना मराठा समाजाने मतदान करु नये असे, आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगे यांनी हा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा-ओबीसी नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
ओबीसींसाठी लढणाऱ्या भुजबळांना पाडू, अशा प्रकारची भाषा जर महाराष्ट्रात सुरु झाली, तर मग ओबीसी समाज महाराष्ट्रात 60 टक्के आहे. प्रत्येक मतदारसंघात तो येतो. त्यामुळे छगन भुजबळांना जर तुम्ही पाडलेत, तर मग हे सर्व ओबीसी 160 मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शेंडगे यांनी दिला.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी एकहाती लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात जालन्यात शुक्रवारी ओबीसी नेत्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. आरक्षण बचाव एल्गार या सभेमुळे जालन्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येते.