अनधिकृत बॅनर हटवून संबंधितांवर कारवाईची मागणी
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा शहरातील प्रमुख चौक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात लावण्यात येणाऱ्या अनधिकृत बॅनरमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असून, शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. वाढदिवस, शुभेच्छा संदेश, राजकीय कार्यक्रम, विविध उत्सव तसेच जाहिरातींच्या माध्यमातून ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर लावले जात असल्याने ‘स्वच्छ व सुंदर म्हसळा’च्या संकल्पनेलाच हरताळ फासला जात असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी तसेच सार्वजनिक मालमत्तेचा आधार घेत बॅनर उभारण्यात येत आहेत. रस्त्याच्या कडेला आणि प्रमुख चौकांमध्ये लावण्यात येणाऱ्या मोठ्या बॅनरमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही बॅनरबाजी केवळ शहराच्या सौंदर्याचा प्रश्न न राहता नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न बनत आहे.
शहरातील अनधिकृत बॅनरबाजीवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बॅनर हटवावेत तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बॅनर लावण्यासाठी प्रशासनाने शहरात निश्चित ठिकाणे उपलब्ध करून द्यावीत आणि त्यासाठी स्पष्ट नियम व परवानगीची प्रक्रिया निश्चित करावी, अशीही मागणी आहे.
विशेष म्हणजे, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करताना कोणताही भेदभाव होऊ नये. राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक कोणत्याही स्वरूपाचे अनधिकृत बॅनर असले तरी संबंधितांवर समान पद्धतीने कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. म्हसळा शहराचा वाढता विस्तार आणि सार्वजनिक ठिकाणांचा वाढता वापर लक्षात घेता अनधिकृत जाहिरातबाजीला आळा घालणे गरजेचे आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांचीही आहे. त्यामुळे अनधिकृत बॅनरबाजीविरोधात प्रशासन आता ठोस पाऊल कधी उचलणार, याकडे म्हसळावासियांचे लक्ष लागले आहे.







