म्हसळा तालुक्यात डोळ्यांची साथ

आरोग्य विभागामार्फत काळजी घेण्याचे आवाहन


| म्हसळा | वार्ताहर |

मुंबईपाठोपाठ आता सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. म्हसळा तालुक्यातही या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हळूहळू डोळ्यांची साथ म्हसळा शहरासह ग्रामीण भागात पसरु लागली असून, रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लहान मुलांपासून वयोवृध्द व्यक्तींचे डोळे येण्याचा आजार बळावला आहे. शाळकरी मुलांचे डोळे येत असल्याने शाळा प्रशासनासमोर चिंतेचा विषय बनला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार म्हसळा तालुक्यात 169 जणांना लागण झाली आहे. डोळे येणे हा आजार खूप गंभीर स्वरूपाचा समजला जात नाही पण तो संसर्गजन्य असल्याने डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांवर परिणाम होत आहे. डोळ्यांच्या साथीबरोबरच सर्दी, ताप, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

डोळे आल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये. डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवावेत. डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे. कुटुंबीयांपासून दूर राहावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे डेोळ्यात टाकावित.

डॉ. वंदन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी
Exit mobile version