काँग्रेस 8, शिवसेना 4 तर एनसीपी 3 जागांवर लढणार
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील 17 जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे 17 पैकी 15 जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या 3 जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा वापर मोठ्या प्रामणावर सुरु आहे. विरोधकांचे नगरसेवक पळवले जात आहेत, 5-5 लाख रुपये ऍडव्हान्स दिले आहेत. ‘बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ चा खेळ सुरु आहे. सत्ताधारी मित्रपक्षांमध्येही पळवापळवी सुरु आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचा भाजपा महायुतीने घोडेबाजार बनवला आहे. भाजपा महायुतीच्या दंडेलशाहीविरोधात महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे.
