स्थलांतरीत पक्ष्यांचा पनवेलमध्ये मुक्काम

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेलमधील बल्लाळेश्‍वर तलावात सध्या विविध पक्ष्यांची रेलचेल आहे. काहींनी येथे संसार थाटला आहे. मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध असल्याने विविध पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पनवेल शहरातील बल्लाळेश्‍वर तलावाला इतिहास आहे. या तलावाला वडाळे तलाव असेही म्हंटले जाते. शहराच्या सौंर्दयात भर घालणार्‍या या तलावात विविध प्रकारच्या पाण वनस्पती आहेत. या वनस्पतींची हिरवी शाल या तलावाच्या पात्रावर पसरलेली असून येथे उगवणारे कमळही आकर्षणाचे केंद्र आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी या तलावात 100 पेक्षा अधिक जातीचे पक्षी निदर्शनास येत होते. मात्र गेल्या काही वर्षांत वाढत्या प्रदूषणामुळे हे प्रमाण कमी झाले होते.

आनंदाची बाब म्हणजे आता या तलावात पुन्हा स्थलांतरीत पक्ष्यांचा वावर वाढला आहे. मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले अन्न आणि विणीच्या हंगामामुळे सध्या वडाळे तलावात पाणकोंबड्यांसोबत इतर पक्ष्यांचा वावर आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, दहा वर्षांनंतर प्रथमच कमळ या स्थलांतरित पक्षी देखील ढेरेदाखल झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर वारकरी अर्थात कॉमन कूट, नक्टा (कोम्ब डक) बदक, जांभळा बगळा, काणूक, हळदकुंकू, टिबुकली, रात्र बगळा यांचा देखील वावर असल्याने पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच ठरत आहे.

पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर
नक्टा (कोम्ब डक) बदक या पक्षाने येथे संसार थाटला असून तलावातील जलपर्णीवर हा पक्षी तरंगते घरटे तयार करतो. या पक्ष्याचे वेगळेपण म्हणजे त्याच्या चोचीवर एक मांसल गाठ किंवा बोनडुक आहे. ही गाठ विणीच्या हंगामात मोठी होती. त्यामुळे हिवाळ्यात नर आणि मादीतील फरक पटकन ओळखता येते. याचबरोबर खारघरमधील खाडी किनार्‍यावर पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाल्याचे पक्षीतज्ज्ञ तारांग सरीन यांनी सांगितले.

दहा वर्षांनंतर प्रथमच या तलावात विविध स्थलांतरित पक्षी निदर्शनास आले आहेत. या पक्ष्यांनी वंश वाढविण्यासाठी तलावात तरंगते घरटी उभारली आहेत. विदेशी पक्षी आले आहेत. पूर्वीप्रमाणे या तलावात पक्ष्यांचा वावर असावा, यासाठी पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

सुदीप आठवले, पक्षीतज्ज्ञ, पनवेल

काही दिवसात हिवाळा सुरु होणार आहे. त्यामुळे विदेशातील स्थलांतरीत पक्षी खारघरमधील खाडीकिनारा हळूहळू येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात विविध जातींची बदके आहेत. पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात पक्षी खारघर खाडीत दिसून येतील.

ज्योती नाडकर्णी, पक्षीप्रेमी, खारघर
Exit mobile version