मंत्रालयावर धडकणार गिरणी कामगारांचा मोर्चा

| रायगड | प्रतिनिधी |

गेली 23 वर्ष गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी बुधवारी (दि.14) सकाळी 11 वाजता गिरणी कामगार आझाद मैदान व सीएसटी येथे एकत्रित येऊन मंत्रालयावर धडक मोर्चाने जाणार आहेत. या मोर्चासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कामगार नेते व कॉ. नरसय्या आडम उपस्थित राहणार आहेत. असे गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग व सरचिटणीस प्रवीण येरुणकर यांनी सांगितले. याप्रसंगी ॲड. गायत्री सिंग, मीना मेनन, कॉ. विठ्ठल घाग, ॲड. विनोद शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश नलावडे, सुहास बने, मारुती विश्वासराव उपस्थितीत राहणार आहेत.

कामगार लढत आहे, मात्र सरकार आश्वासनाशिवाय काहीच करत नाही. मुख्यमंत्र्यांनी 21 ऑगस्ट 2023 च्या बैठकीत जमीन व घरे देण्यासाठी दिलेले आदेश सर्वच संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवले आहेत. मालक व विकासक यांना गिरण्यांच्या जमिनी कायदा करून हस्तांतरित केल्या. त्यावर मोठे टॉवर उभे केले. परंतु कायदा असून देखील गिरणी कामगारांना घरे मिळत नाहीत. कामगारांचे हे दुर्दैव आहे. म्हणून संतापलेला गिरणी कामगार घरांचा निर्णय घेतल्याशिवय आता परत फिरणार नाही. महाराष्ट्रातून हजारो गिरणी कामगार या मोर्चात सहभागी होणार आहेत. असे प्रवीण घाग यांनी सांगितले.

गिरणी कामगार संघटनांनी पसंत केलेली व प्रभाग जिल्हाधिकारी ठाणे यांनी सुचविलेल्या 21.88 हेक्टर जमिनीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन तात्काळ म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतरित करा. काळाचौकी येथील एनटीसीच्या 22 हजार चौरस मीटर जागेवर घर बांधणीला सुरुवात करा. बोरिवली येथील खटाव मिल व प्रभादेवी येथील सेंचुरी मिलचे कायदेशीर भूखंड गिरणी कामगारांच्या घरांसाठी ताब्यात घ्या. पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे गिरणी कामगारांसाठी अन्य गृहनिर्माण प्रकल्प तयार करा. ज्या गिरणी मालकांनी घरांसाठी शून्य हिस्सा दिला आहे. त्या गिरणीच्या जमिनीची महानगर पालिकेकडून पारदर्शक तपासणी करून, त्या जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध करा. पनवेल कोनगाव येथील 2417 घरांचा ताबा तातडीने घ्या.

पनवेल व ठाणे येथील तयार घरांची ऐच्छिक सोडत काढा. अर्ज केलेल्या सर्व कामगारांना घरे देण्याचा आराखडा तयार करा, नंतर ज्या कामगारांनी घरांसाठी अर्ज केला नाही, त्या कामगारांचाही विचार करा.पात्रता निश्चितीसाठी 240 दिवसाची जाचक अट रद्द करा, आणि कोणत्याही एका पुराव्यावर पात्रता निश्चितीसाठी ग्राह्य धरा. गिरण्यांच्या चाळीतील रहिवाशांचा पुनर्विकास त्वरीत करा. अशा विविध मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केल्याचे घाग यांनी सांगितले.

Exit mobile version