। उरण । प्रतिनिधी ।
जेएनपीटीमध्ये एक्स्पोर्ट असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत उरण भागातील एका तरुणाने एका युवकाकडून तब्बल 32 लाख 8 हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी ऋषभ राजेश म्हात्रे (24), रा. म्हातवली, उरण याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार मोहम्मद फहिम अब्दुल कलिम कुरेशी रा. उलवे हे सध्या एका खासगी कंपनीत सीनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते वाशी येथील एका शिपिंग एजन्सीत कार्यरत असताना त्यांची ओळख ऋषभ म्हात्रे यांच्याशी झाली होती.
जानेवारी 2024 मध्ये ऋषभने जेएनपीटीमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती असल्याचे सांगत कुरेशी यांच्याकडून सी.व्ही. मागवला. त्यानंतर एक्स्पोर्ट असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सुरुवातीला 30 हजार रुपये घेतले. पुढे आरोपीने नियुक्तीपत्र, सॅलरी स्लिप, परीक्षा क्लीअरन्स प्रमाणपत्र, जॉब कन्फर्मेशन लेटर, पेनल्टी लेटर अशी विविध बनावट कागदपत्रे तयार करून ती वेगवेगळ्या बनावट ई-मेल आयडीद्वारे कुरेशी यांना पाठवली.
मार्च ते डिसेंबर 2024 या कालावधीत टप्प्याटप्प्याने आरोपीने कुरेशी यांच्याकडून एकूण 32 लाख 8 हजार रुपये उकळले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नाही. संशय आल्याने कुरेशी यांनी कागदपत्रांची तपासणी केली असता ती सर्व बनावट असल्याचे निष्पन्न झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुरेशी यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, वापरलेली बनावट कागदपत्रे, ई-मेल आयडी तसेच आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.






