2025 पर्यंत लाखो रोजगारनिर्मिती

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे सूतोवाच
राज्यात दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रात 2025 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, असे सूतोवाच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. भविष्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेण्यासाठी महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे. महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, सरकारचा रोजगार निर्मितीवर भर आहे. महाराष्ट्रात 2025 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात भविष्य काळात कोणते प्रकल्प येणार आहेत याची माहिती दिली.

नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क
नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क उभे करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचं हे जेम्स ज्वेलरी पार्क असेल. त्यामुळे दीड लाख कर्मचार्‍यांना काम मिळणार आहे. सोबतच यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

नवी मुंबई टाटा संकुल
नवी मुंबईत टाटा संकूल उभारण्यात येणार असून, देशासह राज्यात बेरोजगारीचा प्रश्‍न मोठा आहे. या संकुलाच्या माध्यमातून विक्रमी 1.75 लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळ
नवी मुंबईमध्ये होत असलेल्या विमानतळामुळे अनेक फायदे होणार आहेत. एखाद्या ठिकाणी विमानतळासारखा एखादा प्रकल्प आला तर त्या जागेचा आपोआपच विकास होत असतो. विमानतळामुळे पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. सोबत लाखो लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

ईव्ही पार्क
यावेळी बोलताना सुभाष देसाई यांनी म्हटले आहे की, शासनाचा तळेगाव आणि औरंगाबादमध्ये ईलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारण्याचा विचार आहे. या माध्यमातून सरकारचा इलेट्रॉनिक उत्पादनामध्ये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारकडून देखील तसा प्रयत्न सूरू आहे. या ईलेक्ट्रॉनिक पार्कच्या माध्यामातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. सोबतच स्वस्तात इलेट्रिक वाहने देखील मिळणार असून, इलेट्रिक वाहनांची संख्या वाढल्यास प्रदूषणाला देखील आळा बसेल.

डेटा सेंटरसाठी आर्कषक धोरण
सरकार येणार्‍या काळात डेटा सेंटरसाठी आर्कषक धोरण राबविणार असून, या माध्यमातून अ‍ॅमेझॉन, रिलायन्स, फ्लिपकार्ट या सारख्या मोठ्या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. या माध्यमातून देखील मोठ्याप्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version