लाखो लीटर पाण्याची चोरी, कारवाईची मागणी

| पनवेल| वार्ताहर |

नवीमुंबई महापालिकेच्या मालकीचे असलेले मोरबे धरण या वर्षात शंभर टक्के भरले असले, तरी नवी मुंबईतील अनेक भागांत आजही पाणीटंचाई दिसून येत आहे. त्यातच अवैध नळजोडणीमुळे रोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई पालिकेकडून विभागानुसार आठवड्यातून एकदा पाणीकपात करण्यात येते. मात्र, अवैध नळजोडण्यांमुळे रोज लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पालिकेच्या जलवाहिनीला अनधिकृतपणे जोडणी केल्याने पाणीचोरी केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी मोठमोठे पाण्याचे पंप लावून पालिकेच्या जलवाहिनीतून पाणी खेचले जात असल्याने नागरिकांना अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीचोरीमुळे महापालिकेचेही नुकसान होत आहे. पाणीचोरांना कारवाईची कोणतीच भीती राहिली नसल्याने पाणीचोरीचे प्रमाण वाढल्याची शहरात चर्चा आहे.

पालिकेच्या जलवाहिनीतून पाणीचोरीवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने घणसोली विभागातील पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळ जोडणीविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. घणसोली विभागातील गेल्या वर्षभरात 1150 नळजोडण्या तोडण्यात आल्या असून, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 15 ते 20 जोडण्या तोडण्यात आल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा उपअभियंता नीलेश मोरे यांनी दिली.

पाणीटंचाईच्या तक्रारी
शहराला रोज 430 एमएलडी लीटरपेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यातच पाणीचोरीचे प्रमाण वाढल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याची चर्चा शहरात होत आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पाणीचोरीविरोधात नियमित कारवाई सुरू असून पाणीचोरीसाठी वापरले जाणारे पंपही जप्त करण्यात येत आहेत. सोबतच अनधिकृत बांधकामाची नळजोडणीही तोडत आहोत. यापुढे ही कारवाई सुरूच राहील. तसेच आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात येईल.

नीलेश मोरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, घणसोली

Exit mobile version