। मुंबई । प्रतिनिधी ।
महावितरणच्या सर्व परिमंडळात थकीत वीज देयके तथा वीजचोरी याविरुद्ध धडक कारवाई मोहीम सुरु करण्यात आली असून, अशाच एका तपासणीत भांडूप परिमंडळातील लाखो रुपयांची वीजचोरी उघडीकीस आली आहे. वागले इस्टेट उपविभाकडून उघडीकीस आलेल्या या प्रकरणात एकूण 37,29,500 रुपयांची वीजचोरी करण्यात आली आहे. याबाबत मेसर्स श्रीराम इंडस्ट्रीसचे मालक दिनेश कटीयाल यांच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 05 जानेवरी 2022 रोजी वागळे इस्टेट उपविभागातील सहाय्यक अभियंता विजय पाटील आपल्या दोन सहकारी सोबत नेहमीप्रमाणे वीज मीटरची तपासणीसाठी गेले होते. यासंदर्भात वागळे इस्टेट येथील मेसर्स श्रीराम इंडस्टरीस येथे गेले असता सदर वीजग्राहक बेकायदेशीर वीज वापर करीत असल्याचा संशय सहाय्यक अभियंता पाटील यांना आला. नंतर त्यांच्या वीजमीटरची तपासणी केली असता वीजमीटरचे सील उघड्या अवस्थेत आढळून आले.
यानुसार दि. 06 जानेवरी रोजी सदर वीज मीटरचा घेण्यात आलेला एम. आर. आय अहवाल व सदर ग्राहक असलेल्याच रोहीत्रावरील दुसर्या ग्राहक याचा मागील सहा महिन्याच्या अहवालाची तपासणी केली असता सदर ग्राहक जामर वापरून वीज चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. जामरच्या मदतीने वीज वापराची नोंद होत नाही अथवा कमी होते. याप्रकारे, दिनेश कटीयाल यांनी महावितरण कंपनीची मागील सहा महिन्यात अंदाजे एकूण 37,29,500 रुपयांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीटरशी छेडछाड किंवा मीटर बायपास करणे तसेच वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी करणे गुन्हा असून, अशा या गुन्हेगारी स्वरूपाच्या वीज चोरीच्या कृत्यापासून दूर रहावे असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.