एक कोटीचा महसूल जमा; डिसेंबरपर्यंत थेट सेवा सुरु करण्याचा मानस
| नेरळ । वार्ताहर ।
पर्यटकांचे आकर्षण आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरानच्या मिनीट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला बहुसंख्य पर्यटक भेट देतात. मागील काही दिवसात सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटकांनी येथे जाणे पसंत केले.
निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवत मिनीट्रेन अबालवृद्धांना आकर्षित करते. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानच्या मिनिट्रेनमधून पर्यटन हंगामात तब्बल एक लाख 54 हजारांहून अधिक पर्यटकांनी सफर केली. त्यामुळे मध्य रेल्वेला एक कोटी 12 लाख रुपये महसूल मिळाला. त्याचबरोबर एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत 12 हजार 74 पार्सलची वाहतूकही करण्यात आली.मिनीट्रेनमधून प्रवास करण्याचे आकर्षण लक्षात घेऊन माथेरानमध्ये आल्यानंतर पर्यटक शटल सेवेचा उपयोग करतात.
सध्या मिनीट्रेनची माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू आहे. तर नेरळ- माथेरान- नेरळ मार्गावर गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर नेरळ ते अमन लॉज मार्गावर 20 किलोमीटरपर्यंत नवीन रूळांचे काम हाती घेण्यात आले आहे. अपघात होऊ नये, यासाठी रूळाच्या बाजूला उपाययोजनाही करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण करून नेरळ माथेरानदरम्यानच्या संपूर्ण मार्गावर येत्या डिसेंबरपासून मिनीट्रेन सेवा सुरू करण्याचा मानस आहे.