राजकीय हेवेदाव्यांमुळे पर्यटनविकास रखडला
| पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील ब्रिटिशकालीन हिलस्टेशन असा महसूल दप्तरी कागदोपत्री उल्लेख असलेल्या कुडपण बुद्रुक, कुडपण खुर्द आणि शेलारांचे कुडपण या कुडपण ग्रामपंचायतींतर्गत गावाच्या पर्यटन विकासाची चर्चा गेल्या दोन दशकांपासून सुरू असून, आजतागायत याठिकाणी प्रत्यक्षात पर्यटन विकासाचा मुहूर्त राजकीय हेवेदाव्यांमुळे सापडेनासा झाला आहे.
एकीकडे क्षेत्रपाळजवळील रस्त्यासाठी तत्कालीन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांनी तत्कालीन राज्यमंत्री सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कुडपण रस्त्याचा नारळ फोडला. दुसरीकडे त्यानंतर एका वर्षाने माजी मंत्री प्रभाकर मोरे यांनी तत्कालीन रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अपेक्षा कारेकर यांच्यामार्फत कुडपणला रस्ता करण्यासाठी भूमिपूजन केले. हे दोन्ही रस्ते माती कामासह वाहतुकीला उपलब्ध झाले. यादरम्यान, या ठिकाणी पूर्वापार असलेली वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात तोडली गेल्याने या हिलस्टेशनच्या दिवसाच्या तापमानात थोडीशी वाढ झाली. मात्र, या दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन होऊनही आमदार झाल्यानंतर माणिकराव जगताप यांनी माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या रस्त्याचाच अवलंब करीत पुढील काम पूर्ण केले. पोलादपूरचे भूमिपुत्र व तत्कालीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार असताना प्रवीण दरेकर यांनी रायगडचे भूमिपुत्र असलेल्या तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांचे हिलस्टेशन कुडपणच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून राज्याचे लक्ष कुडपणकडे वेधले. वास्तविक पाहता, राज्यमंत्री असताना सुनील तटकरे यांच्याच हस्ते श्रीफळ वाढवून तत्कालीन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी या कामाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे याकामी दुर्लक्ष होणे निश्चितच दुर्दैवाची बाब होती. आमदारकीच्या काळात माणिकराव जगताप यांनी त्यांच्या दुसर्या आमसभेनंतर रात्रीच्या काळोखात कंदील-मशालींच्या उजेडात शेलारांच्या कुडपणकडे जाण्यासाठी खिंड फोडण्याच्या कामाचा शुभारंभ केला.
खेड येथील लग्नाच्या वर्हाडाचा ट्रक सातारा जिल्ह्यातील कोंडूशी गावातून परत येताना दरीत कोसळल्यानंतर कुडपणपासून कोंडूशीपर्यंत कायमस्वरूपी पक्का रस्ता करण्याची मानसिकता वाढीस लागली. माजी पालकमंत्री अदिती तटकरे या पर्यटन राज्यमंत्रीही असल्यामुळे त्यांनी कुडपणचा पर्यटन विकास घडविण्यासाठी पाहणी दौरा आखण्याचे जाहीर केल्यानंतर स्थानिक आ. गोगावले यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांना विरोध करीत तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कुडपणला आणण्याची घोषणा खासदार गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत केली. यावेळी त्यांनी कुडपणकर सोबत न आल्यामुळे निधीच रद्द करण्याची हमीही दिली होती. दरम्यान, आदिती तटकरे यांचा कुडपण दौरा पूर्ण झाला आणि त्यांनी तब्बल 10 कोटींचा निधी जाहिर केला. पण आ. गोगावले यांनी तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांना विरोधाचा उघड पवित्रा घेतल्यानंतर निधी बारगळला आणि कालांतराने आ. गोगावले यांनीही बंडखोरी करून मंत्रिपदाला अनेकदा गवसणी घातल्यानंतर आजतागायत मंत्रीपद न मिळाल्यामुळे कुडपणच्या पर्यटनविकासाची चर्चा क्षीण झाली. वास्तविक पाहता, आता माजी पालकमंत्री अदिती तटकरे आणि स्थानिक आ. गोगावले हे महायुती सरकारमध्ये असल्याने आपसात समन्वय ठेवून कुडपणचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची अपेक्षा ठेवणे रास्त आहे.
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून स्व. माणिक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या कुडपण ग्रामपंचायतीवर यंदा शिंदे गटाची पर्यायाने आ. गोगावले यांच्या समर्थकांची सत्ता बिनविरोध स्थापन झाली आहे. ‘पालकमंत्री हटाव आणि मी मंत्री होणार’ या संघर्षाच्या काळात कुडपणच्या पर्यटनविकासाची वाट मंदावली आणि हे काम पावसाळ्यामध्ये तर येथील भौगोलिक परिस्थितीमुळे दरडी-उसरे कोसळून वारंवार ठप्प झाले. पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत आता कुडपण रस्ता आणि कोंडूशी रस्त्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, या सर्व प्रयत्नांत कुडपणच्या पर्यटन विकासाची चर्चा पूर्णपणे धूसर झाली आहे.
हिलस्टेशन, शेलारमामांची समाधी, भीमाची काठी पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी नरवीरांच्या पश्चात रायबाचे लग्न लावून कालांतराने वृध्दापकाळाने निधन झालेल्या शेलारमामांची समाधीदेखील आहे. इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, पोलादपूर तालुक्यातील कुडपण हे गाव हिलस्टेशन असल्याचे नमूद करण्यात आले. कुडपण येथे प्रस्तरारोहण करण्यासाठी येथील भीमाची काठी या दुर्गम सुळक्यावर चढाईसाठी बर्मा ब्रिज बांधून काही गिर्यारोहकही तीन-तीन दिवसांचे कॅम्प करत असल्याचे चित्र पर्यटन विकासासाठी आशादायी ठरत आहे. कुडपण गावाचे सुपुत्र नायक कृष्णा सोनावणे यांनी ब्रिटिशांच्या बॉईज कंपनीतून सैन्यात प्रवेश घेतल्यानंतर स्वतंत्र भारतातील सेनादलामधून पाकिस्तानी सैन्याची आणि कबाली घुसखोरांची दाणादाण उडविल्याबद्दल त्यांचा महावीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला. याठिकाणी महावीरचक्रप्राप्त सोनावणे यांचे स्मारक त्यांच्या कुटुंबियांनी उभारले आहे.







