घराची शोभा वाढवतोय मिनिएचर गार्डन

नव्या ट्रेंडचे जिल्ह्यात आकर्षक
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
मुंबई, पुण्याच्या वेशीवर असलेल्या रायगड जिल्ह्यात नागरीकरण जोमाने होत आहे. शिवाय फार्महाऊस संस्कृतीदेखील विकसित होताना दिसत आहे. अशा वेळी घराच्या कोपर्‍यात, बाल्कनीत, किचन व व्हरांड्यात किंवा परसात आकर्षक मिनिएचर गार्डनचा (काचपात्रातील बगीचा) ट्रेंड वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, कमी जागेत तो करता येतो. आणि, अनेकजण घराची शोभा वाढविण्यासाठी व प्रतिष्ठा म्हणूनदेखील हा बगीचा बनवीत आहेत.


मिनिएचर गार्डन ही एक आधुनिक संकल्पना आहे. बागेची आवड असणे पण पुरेशी जागा नसणे त्यांच्याकरिता हा पर्याय खूप चांगला आहे. मिनिएचर गार्डनला ’टेरारियम गार्डन’ व ‘फेअरी गार्डन’ असेही म्हणतात. ‘टेरारियम गार्डन’ म्हणजेच काचपात्रातील बगीचा होय. तर ‘फेअरी गार्डन’ परिकथेतील बगीचा होय. सूर्यप्रकाश येणार्‍या घरातील कोणत्याही छोटा कोपर्‍यात किंवा आजूबाजूला दर्शनी भागात तो साकारता येतो. बाल्कनी, पडवी, ऑफिस टेबल, डायनिंग टेबल किंवा किचन ओट्यावरसुद्धा हा ठेवता येतो. जिल्ह्यात सध्या अनेक लोक याची मागणी खास करून करत आहेत. काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकून फावल्या वेळेत मिनिएचर गार्डन बनवत आहेत. घर, फार्महाऊस किंवा ऑफिसचा एखाद्या किंवा अनेक कोपरे हिरवे दिसावेत या उद्देशाने देखील काहीजण मिनिएचर गार्डन करत आहेत.

असे बनवा मिनिएचर गार्डन
मिनी बाग करताना एखादी मध्यम किंवा लहान आकाराची कुंडी किंवा ट्रे लागतो. अगदी ते फुटलेले असले तरी चालतात. यामध्ये खूप मोठी किंवा पसारा न होणारी झाडे लावावी लागतात. पुरेसा उजेड आणि जागा बघून झाडे निवडली जातात. ऑरनामेंटल प्लांट्स या सदरात मोडणारी झाडे, ग्राउंडकव्हर म्हणून वापरले जाणारे गवत किंवा सक्युलंटस अशी झाडे व गवत वापरतात. उदाहरणार्थ अळीव, गणेशवेल, पुदिना, थाइम, विविध प्रकारची फर्न्स, सक्युलंटस, कोरफड, शतावरी अशी अनेक प्रकारची झाडे व रोपे आहेत. झाडांसाठी कोकोपीट किंवा माती तर सजावटीसाठी लहान रंगीत दगड, छोटी खेळणी शेवाळ, शंख-शिंपले, गोट्या, जुन्या शोभेच्या लहान वस्तू असे काहीही चालते. निवडलेल्या संकल्पनेनुसार साहित्य लागते. अगदी कमी खर्चात हा बगीचा बनतो.

भेट म्हणून देण्यासाठी किंवा घरात सजावटीसाठी काही लोकं ऑर्डर देऊन हा बगीचा बनवून घेतात. या बगीच्यासाठी पाणी व जागा अतिशय कमी लागते. जिल्ह्यात असे गार्डन आता खूप लोक बनवून मागतात. त्यांना हवी तशी डिझाईन व बजेटप्रमाणे झाडे आणि वस्तू वापरून आम्ही बनवून देतो. – अमित निंबाळकर, ग्रीन टच नर्सरी, पाली

मिनिएचर गार्डनमुळे ऑफिस किंवा घरचा एखादा कोपरा सजवता येतो आणि फार जास्त काळजी घ्यावी लागत नाही. दिसायला सुंदर व आकर्षक वाटते. असा बगीचा घरी व फार्महाऊसमध्ये बनवून घेतला आहे. जवळच्या नातेवाईकांना गिफ्ट म्हणून द्यायला अगदी सुंदर आहेत. – कानन शहा, सेरेनिटी वीला, महागाव-सुधागड

Exit mobile version