माथेरानची मिनीबस सेवा कोलमडली

नवीन मिनीबस बसची मागणी

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरानमधील शालेय विद्यार्थी तसेच माथेरानकरांसाठी सवलतीच्या दरात प्रवास असणारी मिनीबस सेवा गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे कोलमडली असून, बंद असलेल्या मिनीबस सेवेचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

11 ऑक्टोबर 2008 रोजी सवलतीच्या दरात सुरू झालेली मिनीबस सेवा कोलमडून पडली असून, सध्या तिला उपचाराची गरज आहे. तत्कालीन परिवहनमंत्र्यांनी माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या प्रयत्नातून माथेरानकरिता सात वर्षांपूर्वी पाठपुवा करून दोन नवीन मिनीबस सेवेत दाखल झाल्या; परंतु त्या माथेरानकरिता सोडून इतरत्रदेखील वापरल्या जात आहेत. माथेरानमध्ये वापरत असलेल्या मिनीबस अतितीव्र चढाव असल्याने खराब होऊन घाटात वारंवार बंद पडत आहेत. त्यावर तात्पुरती मलमपट्टी करून त्या चालवल्या जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

त्यातच ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना सवलतीच्या दरात शासनानेच बस प्रवास सुरु केला होता. त्यामुळे मिनीबससला मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. तर, विद्यार्थिनींना सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध असल्याने विद्यार्थीदेखील बसने प्रवास करत होते; परंतु गेल्या आठ दिवसांपासून घाटात बस सातत्याने बंद पडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही बससेवा बंद केली असल्याचे आगार व्यवस्थापक मानसी शेळके यांनी सांगितले. इंजिनातील बिघाड दूर होताच ही बससेवा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बसमधून प्रवास करणे धोकादायक असून, एखादी दुर्घटना घडल्यास ह्याला जबाबदार कोण, असाही प्रश्‍न प्रवासीवर्गातून विचारला जात आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानकरिता दोन मिनीबस बस देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर बसची माथेरान घाटात चाचणीदेखील झाली. पण, त्या आकाराने मोठ्या असल्याने घाटात वळणावर अडचण येत असल्याने तो प्रस्तावदेखील बारगळला. नवीन बस माथेरानकरिता उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

Exit mobile version