सुधागडमधील पिलोसरी, भार्जेमध्ये अवैध उत्खनन; ग्रामस्थांच्या घरांना तडे, तक्रार केल्यास होतेय मारहाण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात अनेक अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अशातच आता पैशांची खाण असणार्या डोंगरांकडे क्रशरवाल्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. सुधागड तालुक्यातील पिलोसरी, भार्जे गावात दडग, माती, मुरुमासाठी क्रशर चालवून डोंगर बोडके करण्याचं काम माफिया करीत आहेत. महसूल विभागाचा दुर्लक्षितपणा व अर्थकारणामुळे वाळूप्रमाणेच जिल्ह्यात दगड, खडी माफियाराज उभे राहिले आहेत. अनेकदा तक्रारी करुनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येत्या 25 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे सकाळ 11 वाजता ते उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढते बांधकाम, रस्ते आदिसाठी मुरुम, दगड, खडीला मागणी वाढत आहे. त्यामुळे डोंगर पोखरुन दिवस-रात्र क्रशर चालविली जात आहे. डोंगर दिसला कि, तो पोखरुन माती, मुरुम, दगड आदि गौण खनिज काढण्याचा सध्या सुरेंद्र पाटील यांनी सपाटा लावल्याचा आरोप अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे. अल्पावधीतच बक्कळ पैसा देणार्या या व्यवसायामुळे महसूल विभागालाही सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. दगडखाणी, मुरुम आणि वाळूपट्ट्यांच्या लिलावातून सरकारला सर्वाधिक उत्पन्न मिळते. अवैध उत्खननावर कारवाया होत असल्या तरी त्या मर्यादितच आहेत. त्यामुळे अवैध व्यवसायातून महसूल विभागाचेही नुकसान होत आहे. बेकादेशीरपणे सुरू असलेल्या या प्रकारांकडे झोपलेल्या सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.
वनविभाग निद्रावस्थेत
सुरेंद्र पाटील हे हायवा डंपरने सार्वजनिक रस्त्यामधुन वाहतुक करत आहेत. या डंपरमध्ये सुमारे 7/8 ब्रास ओव्हरलोड माल भरला जात असून, दररोज रात्रंदिवस 150 ते 200 डंपर चालून सार्वजनिक रस्त्यांचे नुकसान करत आहेत.हे खाणकाम सार्वजनिक रस्त्यापासून 50 मिटर अंतरापासुन लांब असणे गरजेचे असताना मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवुन क्वॉरी धारकाने रस्त्याला लागुनच खाणकाम व्यवसाय चालु ठेवला आहे. वन विभागाची कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशिरपणे रात्रीची झाडे तोडली जात असून, त्या जागेवर खाणकाम केले आहे. तसेच वनविभागाच्या जागेतही खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वनविभागच्या अधिकार्यांनीही आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा आरोप अॅड. ठाकूर यांनी केला आहे.
महसूल विभागाची मूकसंमती
सुधागड तालुक्यातील पिलोसरी, भार्जे गावात रॉयल्टी बुडवून उत्खनन सुरु आहे. सरकारला महसूल मिळत नसला तरी महसूल अधिकार्यांचा खिसा भरत असल्यामुळे उत्खनन करणार्यांनी अधिकार्यांनी मुकसंमती दिली असल्याचा आरोपही अॅड. ठाकूर यांनी केला आहे.
घरांना तडे, आरोपींकडून मारहाण
खाणकाम ब्लास्टींगमुळे गावातील लोकांच्या घरांना तडे गेले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर क्वॉरी धारकाने गुंड बोलावुन तक्रारदारांना मारहाण केली. याबाबतची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यामध्ये अनिल महादेव डाकी, नितीन कृष्णा केदारी, सुजित किशोर पाटील, महादेव पांडुरंग बडे, सुरेंद्र दत्तात्रेय पाटील (खाण मालक, सुरेंद्र लक्ष्मण शिंदे, घनश्याम हिराजी ठाकूर, अमर बबन पाटील यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.