पोलिसांकडून सहा तास कसून चौकशी; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
| महाड | प्रतिनिधी |
महाडमधील गाजलेल्या राडा प्रकरणात गेल्या 50 दिवसांपासून फरार असलेला राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले पोलिसांना शरण आला. विकास गोगावले याच्यासह अन्य सात आरोपींसह राष्ट्रवादी काँग्रेस गटातील आरोपींनीही शुक्रवारी महाड पोलीस ठाण्यात हजर होत न्यायालयाच्या आदेशानुसार आत्मसमर्पण केलं. त्यानंतर विकास गोगावलेसह अन्य आरोपींची जवळपास सहा तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोडठी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या आरोपींच्या आत्मसमर्पणानंतर सुमारे पाच तासांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संशयित आरोपींनीही महाड तालुका पोलीस ठाण्यात हजर होत समर्पण केलं. या राडा प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमंत जगताप, जगदीश पवार, निलेश महाडिक, धनंजय देशमुख आणि श्रेयस जगताप यांनी पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन नाकारत पोलिसांना फटकारल्यानंतर अखेर दोन्ही बाजूंच्या आरोपींनी समर्पण केलं.
या संपूर्ण प्रकरणात केवळ एका बाजूवरच कारवाई का होत आहे, असा थेट सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना चांगलाच फटकारा दिला होता. परस्पर विरोधी गुन्हे दाखल असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपींनाही अटक करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले होते. राष्ट्रवादीकडून हनुमंत नाना जगताप, संदीप जाबरे, निलेश महाडिक, श्रीयश जगताप आणि धनंजय देशमुख यांच्याविरोधातही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरच कारवाई झाल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही बाजूंच्या आरोपींनी आत्मसमर्पण केल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. 2 डिसेंबर 2025 रोजी महाडमध्ये मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यादरम्यान विकास गोगावले यांच्यावर अजित पवार गटाच्या सुशांत जाबरे यांच्या बॉडीगार्डने रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते.
न्यायालयानं फटकारलं
दरम्यान, राज्यातील महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या अटकपूर्व जामिनाच्या मुद्द्यावरून 22 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जोरदार फटकारलं होतं. “मुख्यमंत्री इतके हतबल कसे? मंत्र्यांची मुलं गुन्हे करून मोकाट फिरतात, तरी पोलिसांना सापडत नाहीत? या राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?” असे थेट सवाल करत न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सरकारला चपराक लगावली होती. यानंतर शुक्रवारी सकाळी विकास गोगावले महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले.
महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यातील आठ आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. आरोपींची चौकशी सुरू असून, पुढील तपास चालू आहे.
-शंकर काळे,
पोलीस उपअधीक्षक, महाड





