नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री

। मुंबई । प्रतिनिधी ।
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याकडील खाती राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यामुळे आता मलिक हे बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. ईडीकडून अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यात मलिक यांच्याकडील खात्यांची जबाबदारी काढून इतरांकडे देण्याचा निर्णय झाला. याबाबत राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्तावही पाठवला. यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला. यानुसार नवाब मलिक यांच्याकडे असलेली दोन्ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर दोन मंत्र्यांकडे देण्यात आली.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिसूचना जारी असून, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नवाब मलिक यांच्याकडील खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे देण्याची शिफारस केली. यानुसार राज्यपालांनी मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवली आहे. याशिवाय मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार काढून तो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गोंदियाचे तर परभणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचं आम्ही ठरवलं आहे.

जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Exit mobile version