| संभाजीनगर | प्रतिनिधी |
शेती आणि रस्त्याच्या वादातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या सख्ख्या भावासह पुतण्याला मारहाण झाल्याची घटना पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अजित मोरेश्वर सावे (70) आणि अमेय अजित सावे (35), रा. खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर अशी जखमींची नावे आहेत. वादातून झालेल्या मारहाणीत दोघेही जखमी झाले असून, त्यांना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेती आणि रस्त्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण झाल्याने या घटनेकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण
