मंत्र्यांचा महामार्ग पाहणीचा दौरा म्हणजे नौटंकीच- पंडित पाटील

| माणगाव | प्रतिनिधी |

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या आमदारांना सोबत घेऊन मुंबई-गोवा या महामार्गाची केलेली पाहणी म्हणजे एक प्रकारची केवळ नौटंकी असल्याचा घणाघात माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे.

पंडित पाटील पुढे म्हणाले, महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास 13 वर्षांपूर्वी सुरुवात होऊन अजूनही ते काम पूर्ण झाले नाही, कधी होईल याची देखील शास्वती देता येत नाही. महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दरम्यान जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची दुरवस्था असते. गणेशोत्सव सणाला मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे येथून चाकरमानी आपल्या गावी कोकणात येत असतात. या चाकरमान्यांना आपल्या गावी येत असताना दरवर्षी महामार्गावर खड्ड्यांचे विघ्न असते. या महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे मुंबईचा 3 तासांचा प्रवास तथा जवळपास 5 तासांचा झाला आहे. या खड्ड्यांमुळे जनतेचा वेळ व पैसाही वाया जात असून प्रचंड खड्ड्यांमुळे वाहन चालक व प्रवासी यांच्या शरीराची हाडे खिळखिळीत झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन जवळपास वर्ष होत आलं आहे. तेव्हापासून या रस्त्याच्या कामाकडे त्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष दिले असते तर महामार्गाचा पनवेल ते इंदापूर एक मार्गिका काम आतापर्यंत पूर्ण झाले असते.

रवींद्र चव्हाण, बांधकाम मंत्री

समृद्धीचे काम पूर्ण
दरवर्षी कोकण वासियांना खड्ड्यांच्या विळख्यातून जावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते. या महामार्गाच्या नंतर बऱ्याच वर्षांनी सुरु झालेला समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन तो मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होईल याच्या विवंचनेत संपूर्ण कोकण वासीय जनता असल्याचे पंडित पाटील म्हणाले.

Exit mobile version