नेरळ-माथेरान-नेरळदरम्यान मिनीट्रेन सुरु करावी – खा. बारणे

। नेरळ । वार्ताहर ।

मावळ लोकसभा मतदारसंघातील थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळदरम्यान चालविली जाणारी मिनीट्रेन पुन्हा सुरु करावी, तसेच मिनीट्रेनला अतिरिक्त प्रवासी डब्यांची संख्याही वाढवावी, अशी मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

मध्य रेल्वे चालवीत असलेली ‘टॉय ट्रेन’ ही सेवा पर्यटकांसह स्थानिकांसाठी एक प्रमुख साधन आहे. मिनीट्रेन आणि माथेरान हे पर्यटनाचे समीकरण आहेत. त्यामुळे गेली दोन वर्षे नेरळ-माथेरान-नेरळ या नॅरोगेज मार्गावर चालविणारी मिनीट्रेन बंद आहे. सध्या टॉय ट्रेन ची शटल सेवा माथेरान ते अमन लॉज या स्थानकाच्या दरम्यान चालविली जात आहे. त्यामुळे हजारो कुटुंबाच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. माथेरान येथे येणारे पर्यटक हे सर्वाधिक टॉय ट्रेन शटल सेवा माथेरान ते अमन लॉजपर्यंतच चालू असल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. डब्ब्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे पर्यटकांना तिकीट मिळत नाही. पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यासाठी टॉय ट्रेन नेरळ-माथेरान-नेरळ अशी सुरु करावी, अशी मागणी मावळत्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्याकडून खासदार श्रीरंग बारणे तसेच मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाऊवस्थापक यांच्याकडे सातत्याने केली जात होती. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची भेट घेऊन यांना निवेदन दिले आहे.

Exit mobile version