| माथेरान | वार्ताहर |
माथेरान या पर्यटनस्थळावरील अबालवृद्धांची मने जिंकणारी तसेच त्यांच्या पर्यटनाला मनसोक्त आनंद देणारी मिनिट्रेन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. नेरळ-माथेरान मिनिट्रेन सुरू झाल्यापासून पर्यटनाची मांदियाळी पहावयास मिळत आहे. मिनिट्रेनला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान पर्यटकांना भेट स्वरूपात तिकीट दरात बदल केले आहेत. 1907 पासून मिनिट्रेन पर्यटकांच्या सेवेत आली. या दरम्यान मिनिट्रेनमध्ये आमूलाग्र बदल झाले. त्याकाळी वाफेचे इंजिन, बोग्यांचा आकार वेगळा होता. त्यामध्ये मध्य रेल्वेने आमूलाग्र बदल करत नॅरोगेजवर अबालवृद्धांना झुकझुक गाडी म्हणून प्रसिद्ध झाली. युनेस्कोनेही मिनिट्रेन हेरिटेज साठी नामांकित केले होते. त्यामुळे भारतीय रेल्वेला जगतिक यशाच्या शिखरावर नेण्यासाठी माथेरान मिनिट्रेन महत्वपूर्ण काम बजावत आहे.
मागील काही वर्षांपूर्वी 1 मे व 8 मे रोजी झालेल्या छोट्या अपघातामुळे मिनिट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली. तीन वर्षांनंतर मध्य रेल्वेने मिनिट्रेन दिमाखात रुळावर आणली आणि पर्यटकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. यावर्षी 4 नोव्हेंबराला नेरळ-माथेरान मिनिट्रेन सुरू झाली याला सुद्धा पर्यटकांचा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. पर्यटकांना स्वर्गीय सुखाची अनुभूती देण्यासाठी तसेच निसर्गाचा आनंद धावत्या मिनिट्रेन मधून देण्यासाठी मध्य रेल्वेने बदल केले. यामध्ये विस्टाडोम बोगीचा समावेश केला आहे, परिवारासाठी वेगळा सलून विभाग केला आहे,प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी सफेद काचा लावून त्यातून सुद्धा पर्यटक निसर्गाचा आनंद लुटू शकतात. माथेरानच्या दळणवळणाच्या एक भाग म्हणजे मिनिट्रेन आहे. माथेरानला येण्यासाठी घाट रस्त्याने खाजगी वाहन किंवा शेअरिंग टॅक्सी उपलब्ध आहेत. हा एकमेव मार्ग असून दुसरा पर्याय म्हणजे मिनिट्रेन आहे. परिवारासोबत दोन तास मौजमजा करत येण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या मिनिट्रेनच्या आधार घेतात. काही पर्यटक तर नेरळ स्टेशनला उतरून गाडी वाहनचालकाकडे देऊन मिनिट्रेनने येणे पसंत करतात. डिझेलवर चालणारी मिनिट्रेन नागमोडी वळणे घेत, जंगल सफर करत, दरीखोऱ्यातून पर्यटकांना आत्मिक आनंद देऊन जाते.
मध्य रेल्वेने यावर्षी तिकीतदरात बदल केले आहेत. यामध्ये काही श्रेणी बोगीचे तिकीट दर वाढले आहेत तर काही श्रेणी बोगीचे तिकीट दर कमी केले आहेत. यामध्ये द्वितीय श्रेणी आसन दर वाढलेले आहेत तर प्रथम श्रेणी दर कमी झाले आहेत. यामध्ये अमन लॉज-माथेरान आणि नेरळ माथेरान याचे वेगळे तिकीट दर वर्गीकरण केले आहेत. प्रथम श्रेणीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी समाधान देणारी दिवाळी भेट दिली आहे. तर, द्वितीय श्रेणी बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या खिशाला काही अंशी कात्री लावली आहे. अगोदर नेरळ-माथेरान तिकीट दर 75 रुपये होते तिथे 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर, प्रथम श्रेणी दरात 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विस्टाडोमच्या दरात वाढ केली नाही. शटल सेवेच्या द्वितीय श्रेणी दरामध्ये 5 रुपयांची वाढ केली आहे तर प्रथम श्रेणी 330 रुपये दर होता त्यात 235 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
अगोदरचे तिकीट दर | आताचे तिकीट दर | |
नेरळ-माथेरान | द्वितीय श्रेणी- 75/- | द्वितीय श्रेणी- 95/- |
प्रथम श्रेणी- 330/- | प्रथम श्रेणी- 340/- | |
विस्टाडोम- 750/- | विस्टाडोम- 750/- | |
अमनलॉज-माथेरान | द्वितीय श्रेणी- 50/- | द्वितीय श्रेणी- 55/- |
प्रथम श्रेणी- 330/- | प्रथम श्रेणी- 95/- |