अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. तलहा मन्सूर घारे (15) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.19) सायं. 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

गोवळकोट मोहल्ला येथील तलहा घारे व त्याचे अन्य चार मित्र पोहण्यासाठी वाशिष्ठी नदीपात्रामध्ये गेले होते. यावेळी वाशिष्ठी नदीच्या उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तलहा हा नदीपात्रात बुडू लागला. आपला मित्र बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी आरडाओरड केली व मदत मागितली. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी नदीकिनारी धाव घेत किनार्यावर असलेल्या बोटी सोडून बुडालेल्या तलहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच याची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आली. तत्काळ घटनास्थळी पोलिस कर्मचारी दाखल झाले. स्थानिक बोटचालकांच्या मदतीने नदीपात्रात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.

Exit mobile version