। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. विशाल बाबू उर्फ अन्वर अली इम्तियाज अन्सारी (24) असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला भारत-नेपाळ सीमेवरून शिताफीने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खारघरमधील जगदीश ऑटोपार्ट्स या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या विशाल बाबू याने ऑक्टोबर 2025 मध्ये पीडित मुलीला गॅरेजमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केले होते. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने पीडित मुलीवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपी हा उत्तर प्रदेशातील कुशीनगर या आपल्या मूळ गावी पळून गेला होता. पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन नातेवाईकांवर दबाव निर्माण करून आणि त्यांना विश्वासात घेऊन सलग 13 दिवस कुशीनगर, गोरखपूर आणि नेपाळ सीमा परिसरात शोधमोहीम राबवली. अखेर पोलिसांनी विशाल बाबू याला नेपाळ सीमेजवळून अटक केली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला नेपाळ सीमेवरून अटक
