जयंत माईणकर
इम्रान प्रतापगढी या उत्तर प्रदेशच्या या उत्तर प्रदेशातील शायर व्यक्तीला काँग्रेस ने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याच सर्वात महत्त्वाचं कारण लोकसभा आणि विधानसभेतील मुस्लिम खासदार, आमदारांची घटती संख्या!
2014 मध्ये मुस्लीम खासदारांची संख्या होती 23. स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतके कमी मुस्लिम खासदार निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असावी. 2019 ला ही संख्या 27 वर पोहोचली. सध्या देशात सुमारे 20 कोटी मुस्लिम असून त्यापैकी सुमारे 90 टक्के मतदार आहेत.
मागच्या चार लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली असता सर्वाधिक मुस्लीम उमेदवार 2004 मध्ये विजयी झाल्याचे दिसते. 2004 च्या निवडणुकीत 34 मुस्लीम उमेदवार, 2009 मध्ये 39. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वात जास्त मुस्लीम खासदार 1980 मध्ये बनले होते. त्या वेळी मुस्लीम खासदारांची संख्या होती 49. हिंदुत्व या शब्दाला ‘राम मंदिर’ आंदोलनामुळे धार चढल्या पासून मुस्लिम खासदारांची संख्या हळुहळू कमी होऊ लागली आणि 2014 ला ती चक्क 23 ला पोचली. 1989 ला 86 जागा जिंकलेला भाजप 2014 ला 282 वर पोचला आणि मत विभाजनाच्या भरवशावर भाजप वाढत गेला. मला 1996 ची यवतमाळची निवडणूक आठवते.1952 पासून सतत काँग्रेस उमेदवार निवडून देणार्या या मतदारसंघात स्व उत्तमराव पाटील यांना उमेदवारी नाकारून काँग्रेस ने गुलाम नबी आझाद यांना उमेदवारी दिली. आझाद दोन वेळा बाजूच्याच वाशिम मतदारसंघातून निवडून आले होते.पण घडल उलटच.भाजपने एक प्रचार तंत्र जिल्ह्यात वापरल. मतदारांना एक संदेश पसरविला गेला.’ तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे की अफझल खान ’…
आणि भाजपचे राजाभाऊ ठाकरे निवडून आले. 1998 ला काँग्रेसने पुन्हा उत्तमराव पाटील यांना उमेवारी दिली आणि ते निवडून आले. मुस्लिम उमेदवार काँग्रेसने दिला की त्या मतदारसंघात भाजपच्या हिंदुत्वाला धार चढते, हा इतिहास! यात अहमद पटेल यांच्या सारख्या दिग्गजाचाही भरूच मतदासंघांत बळी गेला. एक प्रकारे काँग्रेसने मुस्लिम उमेदवार देणं म्हणजे भाजपचा विजय नक्की करणं. त्यामुळे मुस्लिम उमेदवारांना राज्यसभेचा किंवा विधानपरीषदेचा मार्ग जाणीवूर्वक दिला जातो.कारण त्याच्याच भरवशावर अल्पसंख्यांक समाजाची हमखास मिळणारी गठ्ठा मते मिळविता येतात.2018 साली तेव्हा विधानपरिषदेचे उपसभापती असलेल्या माणिकराव ठाकरे यांना विधानपरिषदेची अपेक्षित उमेदवारी न देता त्यांच्या जागी वजाहत मिर्झा यांची वर्णी याच कारणासाठी लावली गेली. मिश्र वंशीय लोकशाहीवादी देशात जेव्हा बहुसंख्यांक धार्मिक , वांशिक, भाषिक मुद्द्यावर एकत्र येतात तेव्हा अल्पसंख्यांक निवडून येण्याची शक्यता कमी होते.
भारतात घडणार्या घटनांचे पडसाद अखंड भारतातील पाकिस्तान आणि बांगला देश या देशांतही घडतात. जसं भारतात 100 कोटी हिंदू आणि 20 कोटी मुस्लिम आहेत. पाकिस्तान ची सध्याची लोकसंख्या सुमारे 23 कोटी असून त्यातील 20 कोटी मुस्लिम आहेत.जस भारतात हिंदूंच्या खालोखाल मुस्लिम धर्माचा समावेश लोकसंख्येनुसार लागतो.तसाच पाकिस्तानमध्ये मुस्लिम धर्माच्या खालोखाल अल्पसंख्यांक म्हणून हिंदु धर्माचा नंबर लागतो. हिंदू समाज आजही पाकिस्तानमध्ये 45 ते 50 लाखाच्या आसपास आहे. तर अनधिकृत आकडेवारीनुसार ही संख्या 80 लाख ते एक कोटी च्या दरम्यान आहे. तर 20 ते 50 हजाराच्या आसपास शीख धर्माचे लोक राहतात. बांगला देशची लोकसंख्या सुमारे 15 कोटी असून सुमारे 1.25 ते 1.5 कोटी हिंदू जनसंख्या आहे. जसा भारतात प्रमुख अल्पसंख्यांक धर्म मुस्लिम आहे तसाच पाकिस्तान आणि बांगला देशातील प्रमुख अल्पसंख्यांक आणि बांगला देशातील प्रमुख अल्पसंख्यांक धर्म हिंदू आहे.
अल्पसंख्यांक समाज जगात कुठल्याही लोकशाहीवादी देशात गठ्ठा मतांसाठी जाणला जातो. आणि हा समाज आपल्याला सुरक्षा, प्रतिनिधीत्व पक्षाकडे झुकलेला असतो. ही वास्तविकता अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्व लोकशाहीवादी देशात सारखा आहे. आणि म्हणूनच अमेरिका , इंग्लंड मधील भारतीय मुख्यत्वे डेमोक्रेटिक आणि लेबर पक्षाला अनुकूल असतात.भलेही ऋषी सूनक हे भारतीय वंशाचे नारायण मूर्ती यांचे जावई सध्या इंग्लंडचे काँझरवेटीव्ह पक्षाचे अर्थमंत्री असतील.
भारतीय उपखंडातील तिनही देशातील अल्पसंख्यांक सुद्धा आपल्याला सुरक्षा आणि प्रतिनिधीत्व देणार्या पक्षाला जवळ करतात. या तीनही देशात एक सारखेपणा आहे. या तीनही देशात अल्पसंख्याकांनी पारिवारिक पक्षालाच जवळ केलेलं आहे. भारतात आजही मुस्लिम समुदाय नेहरू गांधींच्या नेतत्वाखालील
काँग्रेसला अनुकूल आहे. आणि म्हणूनच या पक्षावर मुस्लिमांचा अनुनय करण्याचा आरोप भाजपद्वारे केला जातो.
तर पाकिस्तानमध्ये हिंदूंसाठी हीच जागा भुट्टो परिवाराच्या पाकिस्तान पीपल्स पक्षाची आहे तर बांगला देशमध्ये हीच जागा शेख मुजिबुर रहमान प्रणित अवामी लीग या पक्षाची आहे. बेनझीर पुत्र बिलावल यांचा पाकिस्तानातील शंकराच्या मंदिरात अभिषेक करतानाचा फोटो चांगलाच गाजला होता. तर 1971 ला शाळकरी असकेल्या बेनझिर आपले वडील झुल्पिकर अली भुट्टो यांच्याबरोबर सिमला कराराला हजार होत्या. फ्रॉक घातलेल्या बेनझीरची छायाचित्रे आजही पहायला मिळतात. शेख हसीना या आपल्या कुटुंबाच्या हत्याकांडातुन वाचू शकल्या कारण तेव्हा त्या दिल्लीत शिक्षणासाठी होत्या.
हिंदूबहुल भारतात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यापासून डॉ झाकीर हुसेन, ए पी जे अब्दुल कलाम, अहमद पटेल यांच्या सारख्या मुस्लिम नेत्यांची मांदियाळी दिसते, तशी जरी नाही तरीही काही प्रमाणात या दोन्ही देशात हिंदू नेतृत्व दिसत. पाकिस्तान मधील अमरकोट किंवा उमरकोट या हिंदू बहुल आणि हिंदू लोकप्रिनिधी असलेल्या भागात आजही करणी सिंग सोधा या नावाचं नेतृत्व दिसत.त्यांचे वडील राणा चंद्रसिंग हे पाकिस्तानात चक्क सात वेळा खासदार होते आणि भुट्टो मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा होते. पुढे त्यांनी पाकिस्तान हिंदू लीग या नावाच्या केसरी रंगाचा ध्वज असलेल्या पक्षाची स्थापना गेल्या दशकात केली.अर्थात जसा भारतात जसा मुस्लिम लीग आहे तसच पाकिस्तान मध्ये हिंदू लीग! अमरकोट च महत्त्व यासाठी की येथील किल्ल्यात अकबराचा जन्म झाला होता. करणी सिंग ची पत्नी जयपूरच्या कानोटा (जयपुर) येथील
ठाकुर मानसिंह च्या मुलीशी लग्न केलं आहे. त्यांचा मुलगा सुद्धा मंत्री होता.भारतात ज्याप्रमाणे टीळा लावण्यासाठी भाजप सारख्या उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी पक्षात एक दोन मुस्लिम नावं असतात, तशाच प्रकारची हिंदू नाव आपल्याला पाकिस्तानातील प्रत्येक पक्षात राजकीय पक्षात सापडतील. चटच् या पक्षात मंगला शर्मा नावाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधी आहेत. तर महेश कुमार मालानी आणि कृष्णा कुमारी यासारखे ही नाव पाकिस्तान पीपल्स पार्टी मध्ये सापडतात. कृष्णा कुमारी कोहली या दलीत असून सिनेट अध्यक्षाच्या गैरहजेरीत त्या अध्यक्ष होत्या आणि त्याचवेळी पाकिस्तान सिनेटने भारताच्या ताब्यातील काश्मीर विषयी ठराव पारित केला होता. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात झाली होती.
दिलीप बरूआ, या नावाचे कम्युनिस्ट नेते बांगला देश चे उद्योग मंत्री होते.2018 साली झालेल्या बांगला देश संसदेच्या निवडणुकीत चक्क 17 हिंदू उमेदवार निवडून आले होते .यात महिलांचाही समावेश आहे.
भारतात ज्याप्रमाणे संघ भाजपद्वारे हिंदुत्वाचा प्रचार केला जातो त्याच प्रकारे मुस्लिम लीग किंवा इतर कट्टर पंथी पक्षाद्वारे इस्लामचा प्रचार केला जातो. बाबरी मस्जिद, गोध्रा दंगल यासारखे प्रकार पाकिस्तान, बांगला देशातही घडतात. सोबतीला जबरदस्तीच्या धर्मांतराचाही आरोप केला जातो. आणि अर्थात अशा घटना भारतीय उपखंडाच्या या तीनही देशात घडतात. पण लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात जसे मुस्लिम अल्पसंख्यांक तसेच पाकिस्तान , बांगला देश मध्ये हिंदू अल्पसंख्यांक. तीन देश मिळून शंभर ते 102 कोटींच्या आसपास हिंदू लोकसंख्या आहे तर सुमारे 55 कोटी मुस्लिम. अर्थात निवडून येण्यासाठी या तीनही देशात अल्पसंख्यांकांची मते महत्त्वाची ठरतात. आणि ज्या पक्षाला अल्पसंख्यांक मोठ्या प्रमाणात मतदान करतात त्या पक्षावर इतर पक्ष अल्पसंख्यांकांच्या अनुनयाचा आरोप करतात. आणि हा आरोप नेहमी बहुसंख्यांक धर्माधिष्ठित पक्षाकडून केला जातो. हे अयोग्य असल तरीही हा सल्ला कोणाला देणार? समाजवादी नेते डॉ राम मनोहर लोहिया यांनी भारत – पाक संघराज्य याचा विचार मांडला होता 1960 च्या दशकात. पुढे 1989 ला जर्मनी एक झाला, मात्र युगोस्लाव्हीया चे सात तुकडे पडले , पाकिस्तान दोन भागात विभागला गेला बांगला देश झाला. पण संघराज्याच्या विचार कागदावरच राहिला. तीनही देशातील नेते या प्रस्तावावरची धूळ झटकतील? तूर्तास इतकेच!