खारघर रेल्वे स्थानक परिसरात उच्छाद
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
हार्बर मार्गांवरील खारघर रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवाशी ये-जा करत असतात. मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या या परिसरात अल्पवयीन मुलांकडून भीक मागवण्याचे प्रकार वाढत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानकाबाहेरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल परिसरात ही मुले दिवसभर फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, स्टॉलवर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडे पैसे मागणे, सतत मागे लागणे तसेच त्रासदायक वर्तन करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खारघर परिसरात अनेक शैक्षणिक संस्था व महाविद्यालये असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ रेल्वे स्थानकात असते मात्र, स्थानक परिसरातील वाढत्या भिकाऱ्यांच्या त्रासामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा अल्पवयीन मुलांना पुढे करून भीक मागवली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.स्थानिकांनी प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अल्पवयीन मुलांचा वापर करून भीक मागवणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे एकच बाळ, पण भीक मागणाऱ्या महिला मात्र वेगवेगळ्या असल्याचे समोर आले आहे. खारघर रेल्वे स्थानक परिसरात भीक मागण्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.
स्थानकात प्रवेश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुख्य मार्गात एका लहान बाळाला झोपवून त्याच्या नावाखाली भीक मागितली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे तेच बाळ दिवसभर त्या ठिकाणी असते, पण भीक मागणाऱ्या महिला मात्र वेळोवेळी बदलत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलांचा वापर करून संघटित पद्धतीने भीक मागवली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रवेशद्वारात फेरीवाले
रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातच फेरीवाल्यानी आपले बस्थान बसवल्याचे पाहायला मिळत असून, थंड पेय विक्रीसाठी हातगाड्या रेल्वे स्थानकाच्या वास्तुमधेच उभ्या करून व्यवसाय केला जात असल्याचे पाहायला मिळते.
या प्रकाराकडे दुर्लक्ष न करता याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी सिडको, रेल्वे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.तसेच या मागे काही अर्थकारण आहे का याचा शोध घेणे गरजेचे आहे.
मंगेश रनवडे,
शिवसेना महानगर संघटक
