सेल्फिच्या बहाण्याने विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन

पोलिसांनी विकृताला ठोकल्या बेड्या

। ठाणे । प्रतिनिधी ।

सेल्फी काढण्याच्या बहाण्याने एका विकृताने तीन विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहात उभ्या असताना हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या विकृतीला विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या पीडित विद्यार्थिनी आठ ते दहा वयोगटातील असून त्या शुक्रवारी शाळेत जाण्यासाठी रिक्षा स्टॅण्डवर उभ्या असताना विकृत त्या ठिकाणी आला. त्याने मुलींसोबत सेल्फी घेण्याचा बहाणा केला. दरम्यान, तो जबरदस्ती करत असल्याचे लक्षात येताच पीडित मुलींनी शेजारी असलेल्या घरात धाव घेतली. मात्र, विकृतही त्यांची पाठलाग करत घरात घुसला आणि त्याने मुलींसोबत गैरवर्तन केले. यावेळी पीडितांनी मदतीसाठी टाहो फोडत आरडाओरडा केला असता शेजार्‍यांनी या विकृताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विठ्ठलवाडी पोलिसांनी पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार विकृताविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. न्यायालयाने या विकृताला 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांनी दिली आहे.

Exit mobile version