माथेरान वाहनतळावर कर्मचाऱ्यांकडून गैरव्यवहार?

मशीनमध्ये हेराफेरी, पावत्यांमध्ये होतोय बदल

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानच्या वनजमिनीवर वसलेल्या पर्यटन स्थळांवर वाहनांना बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांची वाहने तेथील दस्तुरी येथे उभी केली जातात. यासाठी पर्यटकांकडून वाहन कर वनविभाग आकारत असते. मात्र, तेथील वाहनतळ कर्मचाऱ्यांकडून दररोज गैरव्यवहार केला जात असल्याचे उघड झाले असून, पालिकेने स्पष्टीकरण करण्याची नोटीस कर्मचाऱ्यांना बजावली आहे. दरम्यान, पालिकेकडून कोणतीही कारवाई या कर्मचाऱ्यांवर केली जात नसल्याने पालिकेच्या कामात गैरव्यवहार प्रकरणे वाढली आहेत, असा आरोप माथेरानकरांकडून करण्यात येत आहे.

शहरात वाहनांना बंदी असल्याने पर्यटकांना आपली वाहने दस्तुरी येथे पार्क करून ठेवावी लागतात. त्यासाठी वन विभाग आणि गिरिस्थान नगरपरिषदेकडून वाहनांच्या पार्किंगसाठी पैसे आकारले जातात. तेथील वाहनतळ येथील वाहने पार्किंगचे बदल्यात एका चारचाकी वाहनाला एका दिवसाचे भाडे 100 रुपये आकारले जातात. त्यातील 50 रुपये हे वन विभाग यांच्या खात्यात जमा होत असतात, तर अन्य 50 रुपये हे नगरपरिषदेसाठी आकारले जातात. त्यासाठी पालिका आणि वनविभाग यांचे कर्मचारी 24 तास सेवेत असतात. येणाऱ्या सर्व गाड्यांकडून वाहन कर आकारला जातो. तर एका दिवसाहून अधिक दिवस मुक्काम करणाऱ्या वाहनांकडून मिळणारे अतिरिक्त भाडे हे नगरपरिषद संकलित करीत असते. त्यामुळे नगरपरिषद आणि वन विभाग यांच्या दररोजच्या वाहनकर संकलनात तफावत असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वन विभाग हा वाहनतळ येथे जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर 50 रुपये आकारत असते, मात्र पालिकेला गाड्यांच्या मुक्कामाचे अतिरिक्त पैसे मिळत असतात. वाहनतळ येथे पार्किंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनकर याचा हिशोब दिवसातून दोनवेळा होत असतो आणि त्याचा भरणा वन विभाग आणि नगरपरिषद आपल्या कार्यालयाकडून बँकेत करीत असते. नगरपरिषदेकडून कंत्राटी कामगार तर वन विभाग यांच्याकडून संयुक्त वन व्यवस्थापन समितीने पगारावर ठेवलेले कर्मचारी हे वाहन कर संकलन करीत असतात. त्या कराचा भरणा करताना हातचलाखी कर्मचारी करतात आणि दस्तुरी वाहनतळ तेथे दररोज पैशाचा गैरव्यवहार होत असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष जमा होणारे वाहनकर यांची पावती बनविली जाते आणि नंतर त्या दिवसाचे कर संकलनाची दुसरी पावती बनवून आर्थिक गैरव्यवहार वाहनतळावर गेली अनेक महिने सुरू आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याबाबत तेथे असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमधून वाहनतळ कर वसूल करणारे कर्मचारी पैशांचा कसा गैरव्यवहार करतात याची चित्रफित व्हायरल झाली आहेत. त्यानंतर नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी वाहनतळ कर संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. तर, पालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून वाहनतळ कर संकलन मशीनमध्ये दररोज फेरफार केला जात असल्याचे स्पष्ट दिसत असूनदेखील पालिका त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करीत नाही, याबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

वाहनकर रीतसर वसूल केला जातो आणि वन विभागाचा वाहन कर हा संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत दररोज बँकेत जमा केला जातो. आमचे कोणतेही कर्मचारी हा कर वसूल करीत नाहीत, तर केवळ नगरपरिषद कर्मचारी हा कर संकलित करीत असतात. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी मशीनमध्ये काही बदल केले असतील, तर त्याची आम्हाला कोणतीही माहिती नाही.

राजवर्धन आढे, वनपाल, माथेरान

आमच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर माझ्याकडून संबंधित विभागाला खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वैभव गारवे, मुख्याधिकारी, माथेरान
पालिका प्रकरणे दाबून ठेवणार काय?
माथेरान नगरपरिषदमध्ये या वर्षात कपाडिया मार्केटमधील गाळ्यांचे बेकायदा हस्तांतरण झाले आहे. तर, वार्षिक साहित्य खरेदीमध्ये पुरवठा करताना लोखंडी पत्रे यांचा पुरवठा दिलेल्या ऑर्डरप्रमाणे झालेला नाही. ही दोन गैरव्यवहाराची प्रकरणे झाली असून, त्यावर कोणत्याही अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई झालेली नाही. आता वाहनतळ कर संकलन यात झालेला गैरव्यवहारदेखील कारवाई न होता दाबला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Exit mobile version