लक्झरी गाडीची सैर; पोलीस प्रशासन अनभिज्ञ
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी कोणत्याही वाहनांना प्रवेश बंदी आहे. ब्रिटिश काळापासून लागू झालेले हे नियम आजही कायम असून या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते. मात्र, तरीदेखील काही पर्यटक आपली वाहने माथेरानमध्ये आणून नियम भंग करण्याचे काम करतात. शनिवारी रात्री अंधाराचा फायदा घेऊन एका लक्झरी गाडीने माथेरान अमन लॉज येथून शहरात प्रवेश केला आणि शहरातून मुक्त संचार करून दस्तुरी येथे येऊन पळ काढला. दरम्यान, या बाबत माथेरान पोलीस अद्याप अनभिज्ञ आहेत असे दिसून आले आहे.

शनिवारी रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन माथेरान मधील दस्तुरी वाहनतळ येथे एक लक्झरी गाडी ही वाहनतळ येथून रुग्णवाहिका शहरात जाणाऱ्या मार्गाने थेट अमन लॉज स्थानक येथून माथेरान गावात जाणाऱ्या महात्मा गांधी रस्त्याने पुढे निघाली आणि काही वेळाने पुन्हा अमन लॉज येथे परत आली. त्या गाडीमध्ये काही पर्यटक होते आणि माथेरान गावातून सैर करून गाडी परत येताना त्या गाडीमध्ये कोणी नव्हते. याचा अर्थ माथेरान गावात जाऊन प्रवाशानं सोडून ती लक्झरी गाडी पुन्हा दस्तुरी नाका येथे आली. आणि तेथून घाट उतरून निघून गेली आहे. या बाबत माथेरान पोलीस ठाणे यांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही. माथेरान मधील सर्व रस्त्यांवर आणि जागोजागी सीसीटीव्ही कॅमरे यांचे जाळे आहे. त्या कॅमेऱ्यात त्या गाडीबद्दल सर्व माहिती स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, तरीदेखील माथेरान पोलीस यांना कोणतीही माहिती नाही. असे सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांना संपर्क साधला असताना त्यांनी सांगितले.
लोखंडी गेट कधी बंद करणार
माथेरान शहारत प्रवेश करण्यासाठी एकमेव रस्ता असून चेडोबा मंदिर येथून वाहने माथेरान शहरात येऊ शकतात. रुग्णवाहिका येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर तेथे असलेले लोखंडी गेट हे मागील काही वर्षे कुलूप लावून बंद असायचे. ते गेट दिवसरात्र उघडे असते आणि त्यामुळे वाहने येण्याचे प्रकार माथेरान मध्ये सहजपणे घडत आहेत.