सह जिल्हा निबंधक आणि दुय्यम निबंधकांचा गैरकारभार

नोंदणी उपमहानिरीक्षकांकडे अलिबागमधील वकिलांची तक्रार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दस्तऐवजातील पक्षकारांची आणि पर्यायाने त्यांच्या वकिलांची छळणूक करणे आणि अर्थपूर्ण संवाद करून त्याचा गैरफायदा घेणे असा प्रकार दुय्यम निबंधक करीत असल्याचा आरोप करण्यात आला असून यासंबंधी तक्रार केली असता त्याबद्दल कोणतीही कारवाई केली जात नाही. या कारभाराची चौकशी करून किंवा योग्य ती कारवाई करण्याची मागणी नोंदणी उपमहानिरीक्षकांकडे अलिबागमधील वकिलांनी केली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अलिबाग येथिल राहणारे असून आमच्यातील काहीजण वकिली व्यवसायातील आहेत. स्थावर मिळकतीच्या दस्तऐवजाच्या नोंदणीकरिता आणि इतर तद्अनुषंगीक कामांकरिता आमचा बरेच वेळा दुय्यम निबंधक अलिबाग व जिल्हयातील इतर दुय्यम निबंधक कार्यालये तसेच सह जिल्हा निबंधक यांच्या कार्यालयांशी आमचा संबंध येतो. अलिकडच्या काळात दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात दस्तऐवजाच्या नोंदणीकरिता जाण्यापूर्वी अनेक कागदपत्रे अनेक ठिकाणाहून प्राप्त करून घ्यावी लागतात. वास्तविक इंडियन रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट मधील तरतूदी प्रमाणे दुय्यम निबंधक यांचे अधिकार संबंधीत सर्व दुय्यम निबंधकांना त्याची माहिती असणे अभिप्रेत आहे. परंतू तसे प्रत्यक्षात दिसत नाही. अलिकडे मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, फोलिओ फी इत्यादींचा भरणा ऑनलाईन च्या पदप्रणालीने करावा लागतो. अलिबाग हे जिल्हयाचे मुख्य ठिकाण असून सुध्दा अनेकवेळा इंटरनेट सुविधा बंद असणे / व्यवस्थित नसणे यामुळे पक्षकारांच्या कामात अडथळा व दिरंगाई होत असते. त्यामुळे पक्षकारांचा वेळ देखिल वाया जात असतो. त्यामुळे नेमलेल्या दिवशी काम न झाल्यामुळे पक्षकारांना पर्यायाने त्यांच्या वकिलांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच प्रत्यक्ष दस्तऐवज नोंदणीकरीता हजर केल्यानंतर तेथिल दुय्यम निबंधक विनाकारण कोणताही अधिकार नसतांना दस्ताची नोंदणी करण्यास नकार देतात किंवा पक्षकारांची आणि त्यांच्या वकिलांची अपरिमित छळणूक करतात असा आरोप केला आहे.
इंडीयन रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट मध्ये दुय्यम निबंधकाचे अधिकार व कर्तव्य नमुद केलेली आहेत. परंतु त्याचा कोणताही विचार न करता केवळ दस्तऐवजातील पक्षकारांची आणि पर्यायाने त्यांच्या वकिलांची छळणूक करणे आणि अर्थपूर्ण संवाद करून त्याचा गैरफायदा घेणे असा प्रकार दुय्यम निबंधक करीत आहेत. यासंबंधी तक्रार केली असता त्याबद्दल कोणतीही कारवाई केली जात नाही. यासदंर्भात आपण स्वतः चौकशी करून किंवा योग्य ती कारवाई करून सामान्य जनतेची कामे, पक्षकारांची आणि वकिलांची छळणूक होणार नाही तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील कोणताही कर्मचारी सामान्य जनतेशी उध्दटपणे वागणार नाही याची पुरेशी खबरदारी घेण्याकरीता जी काही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अ‍ॅड. संजीव माधव जोशी, अ‍ॅड. सचिन बाबूराव जोशी, अ‍ॅड. नरेंद्र जी. ठाकूर, चारूदत्त सदाशिव गुरूजी, अनिल रमेश चोपडा यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Exit mobile version