अल्पवयीन तरुणीशी गैरवर्तन

पोलादपूरमध्ये चौघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील आंबेडकरनगर वसाहतीमधील बुद्धविहारात झालेल्या वादातून अल्पवयीन तरुणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी चौघांविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आंबेडकरनगर येथील बुद्धविहारामध्ये फिर्यादीच्या नातेवाईकांची बैठक सुरू होती. रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास उमेश अनंत पवार, दिनेश अनंत पवार, योगेश अनंत पवार आणि दिनेश पवार हे चौघे तेथे आले. त्यांनी 14 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान फिर्यादीच्या वडिलांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचे सांगितले जाते.

या वादात परिस्थिती चिघळू नये म्हणून फिर्यादी असलेल्या अल्पवयीन तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी तिच्याशी झटापट करत तिची कॉलर पकडून मारहाण केली. यावेळी तिच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. तसेच एका आरोपीने तिचे केस पकडून खाली वाकवले, तर दुसऱ्याने उपस्थितांसमोर अश्लील व अवमानकारक भाषा वापरून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे. फिर्यादीचे वय 16 वर्षे 11 महिने असल्याने याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोस्को) कायदा 2012 मधील कलम 11(1) व 12 अंतर्गत चारही आरोपींविरोधात रविवारी पहाटे 3.20 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश मुंढे करत आहेत.

Exit mobile version