मुरूड आगाराचा गलथान कारभार

नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरूड बस आगारातील बसेस वारंवार नादुरुस्त होत रस्त्यावर बंद पडत असून, याचा मोठा फटका आणि त्रास प्रवाशांना होत आहे. या प्रकाराने प्रवासी हैराण झाले असून, एसटी प्रशासनाने या समस्येवर त्वरित उपाययोजना करून नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन शिवसेना मुरूड शहर प्रमुख आदेश दांडेकर आणि सेना कार्यकर्त्यांनी मुरूड आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.

जुन्या आणि सतत नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशी, विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असून, अनेकांना मिळेल त्या वाहनाने खर्चिक प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यात एसटी हेच प्रवासाचे मुख्य साधन आहे. बस आली नाही तर स्टॉपवर ताटकळत राहावे लागत आहे. एसटी बसेस कुठेही यांत्रिक बिघाडामुळे बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांची सुरक्षिततादेखील धोक्यात आली आहे. यामुळे किमान 15 नवीन एसटी बसेस मुरूड आगाराला मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुरूड-तळामार्गे पुणे ही सकाळी सहा वाजताची बस फेरी सुरू करावी. तळा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि पर्यटक, व्यापारी प्रवासी या फेरीचा लाभ घेऊ शकतात. सकाळी 9 वाजता मुरूड ते औरंगाबाद, सकाळी 10 वाजताची मुरूड ते ठाणे या फेर्‍यादेखील सुरु करावयात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. परिवहन विभागाकडे नवीन बसेस उपलब्ध झाल्याचे कळते. त्यातील 15 बसेस मुरूड आगाराकडे देण्यात याव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एसटी बस सेवा हीच मुरूड तालुक्यातील हक्काची आणि विश्‍वासाची प्रवासी जीवनवाहिनी आहे, अशा प्रतिक्रिया प्रवासीवर्गातून व्यक्त होते आहेत.

Exit mobile version