माथेरानच्या राणीने शिरस्ता मोडला; पर्यटकांच्या दिमतीला न आल्याने नाराजी
| नेरळ | प्रतिनिधी |
ब्रिटिश काळात सुरु केलेल्या पर्वतीय मार्गावरील नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने प्रवाशांसाठी बंद होती. माथेरानच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि दरडी कोसळण्याच्या भीतीने मिनीट्रेन बंद ठेवली जाते. 15 जून रोजी पावसाळी विश्रांती घेण्यासाठी जाते आणि पुन्हा 15 ऑक्टोबर रोजी ती प्रवाशांच्या दिमतीला येत असते. मात्र, यंदा माथेरानची राणी प्रवाशांच्या सेवेत आली नाही. दरम्यान, नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावर सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे मिनीट्रेन वेळेवर सुरु झाली नाही आणि त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.
यावर्षी मिनीट्रेन बंद होण्याचा आणि पुन्हा प्रवाशांच्या सेवेत येण्याचा शिरस्ता मध्य रेल्वेकडून मोडला आहे. कारण, यावर्षी 15 जूनऐवजी सात जून रोजी मिनीट्रेन पर्यटक प्रवासी यांच्यासाठी बंद करण्यात आली. त्यात यावर्षी पावसाळा सात जून रोजी सुरु झाला नव्हता. तर, आजदेखील 15 ऑक्टोबर रोजी नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवासी हंगाम सुरु करू शकली नाही. पावसाळी सुट्टीसाठी गेलेली मिनीट्रेन हिवाळी पर्यटन हंगामासाठी वेळेवर सज्ज झाली नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर पूर्वी किमान चार ते पाच फेर्या चालविल्या जात होत्या. मागील दोन वर्षी या मार्गावर केवळ दोनच फेर्या चालविण्यात आल्या होत्या. त्यामुळेदेखील पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली होती. आज वेळेवर मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरु झाली नसल्याने माथेरानच्या डोंगरातील हिरवे गवत पाहण्याची संधी हुकली आहे.
मंगळवारी 15 ऑक्टोबरपासून मिनीट्रेनचा पर्यटन हंगाम सुरु होत असतो. मात्र, नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर सध्या नॅरोगेज मार्ग दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरु झाली नाही. मात्र, पुढील काळात कोणत्या तारखेला मिनीट्रेन सुरु होणार याबद्दलदेखील कोणतीही माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. तर, दररोज नेरळ येथून मालवाहू गाडी चालवली जात असतानादेखील मिनीट्रेनचा प्रवासी हंगाम सुरू झालेला नसल्याने पर्यटक आणि माथेरानमधील व्यावसायिक नाराजी व्यक्त करीत आहेत.