सचिनचा विश्‍व विक्रम मोडण्याची संधी हुकली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 30 शतके झळकावण्याचा विश्‍वविक्रम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत स्मिथला हा विश्‍वविक्रम मोडण्याची संधी होती, मात्र तो तसे करू शकला नाही.

सर्वात वेगवान 30 कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत स्मिथने त्याचा सहकारी मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 30 किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारे केवळ 14 फलंदाज आहेत आणि स्टीव्ह स्मिथ आता त्यापैकी एक आहे.

स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 104 धावा केल्या आणि हे त्याचे 30 वे कसोटी शतक ठरले. स्मिथने 30 वे कसोटी शतक पूर्ण करण्यासाठी एकूण 162 डाव घेतले, तर सचिन तेंडुलकरने त्याच्या 159व्या कसोटी डावात ही कामगिरी केली. या विशेष यादीत स्मिथ आता दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याच्या खालोखाल मॅथ्यू हेडन 167 डावांसह आणि त्यानंतर रिकी पाँटिंग 170 डावांसह आहे. पाचव्या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत, ज्यांनी आपल्या 174 व्या कसोटी डावात जादूई आकडा गाठला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सिडनी कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे पूर्ण झाला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 131 षटकात 4 बाद 475 धावा केल्या आहेत. मॅट रेनशॉ पाच आणि उस्मान ख्वाजा 195 धावांवर खेळत आहे. स्मिथने 192 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.

Exit mobile version