माथेरान येथून हरवलेली मुलगी सापडली

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरातील इंदिरानगर भागातील 15 वर्षीय दहावी इयत्तेत असलेली मुलगी घरचे सतत ओरडतात यामुळे घरातून निघून गेली होती. मात्र शहरातील तरुणांनी नेरळ पासून मुंबईपर्यंत सर्व ठिकाणी शोध घेवुन त्या लहान मुलीला सुखरूप घरी आणले आहे.

इंदिरानगर भागातील 15 वर्षाची मुलगी घरातून अचानक निघून गेली असल्याने तिचा शोध घेवून देखील माहिती मिळाली नाही. त्यावेळी ती मुलगी टॅक्सी पकडून नेरळ येथे गेली त्यानंतर ती नेरळ रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणारी लोकल पकडून पुढे गेली असल्याचे नेरळ रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता दिसून आले होते. त्यावर माथेरान मधील तरुण कार्यकर्ते राकेश कोकळे, आशिष सावंत, संतोष पवार, आदेश घाग, अंकुश कोकरे, संतोष ढेबे, केतन रामाने, अमर शिंदे, प्रमोद पाटील, धीरज कदम, शुभम सकपाळ, करण जानकर, सचिन ढेबे आदी तरुण तिचा शोध घेण्यासाठी मार्गस्थ झाले.

नेरळ येथे आल्यावर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस यांची मदत घेवून  सीसीटिव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या लोकलमधून कोणत्या स्थानकात उतरली हे दिसून आले नाही.  त्यानंतर देखील शोध लागत नसल्याने माथेरान मधील त्या 20 तरुणांनी वेगवेगळ्या तुकड्या केल्या आणि त्यांच्या माध्यमातून मुंबईकडे जाणारी रेल्वे स्थानकांवर जावून तपास घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक तुकडी अंबरनाथ येथून नेरळ स्थानकात परत आली. त्यावेळी करण जानकर आणि राकेश कोकळे यांना ती नेरळ स्थानकात दिसून आली. त्यानंतर मुलीला ताब्यात घेवून समजूत काढली आणि माथेरान येथे आणण्यात आले. तिचे दहावीचे वर्षे असल्याने घरचे लोक ओरडतात म्हणुन घरातून निघून गेली होती. मात्र दोन दिवसांनी सुखरूप परत आल्याबद्दल सर्वांना हायसे वाटले. कोणताही अनर्थ न घडता मुलगी घरी आल्याने स्थानिक तरुणांचे कौतुक पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version