निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांची कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी गुरुवारी (दि. 7) रात्री मिशन ऑलआउट मोहीम हाती घेतली. अवैध धंद्यावर आळा बसविण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हे मिशन राबविले. या झाडाझडतीमध्ये दारु विक्री करणार्यांपासून अनेक हॉटेलांवर छापे टाकण्यात आले. तसेच वाहतुकीचे नियम मोडणारे व काही संशयितांविरोधातदेखील कारवाई करण्यात आली. या मिशनमुळे अवैध धंदे चालविणार्यांना दणका देण्यात आला.
जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस कामाला लागले आहे. गावागावात रुट मार्च घेऊन गैरप्रकार करणारे व कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गुरुवारी रात्री मिशन ऑल आऊट सुरु करण्यात आले. रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत हे मिशन जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा अशा एकूण 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आले. गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या निमित्ताने ऑल आऊट मिशन सुरु केले.
गावागावात जाऊन पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. हॉटेल, लॉज, रिसॉर्टची तपासणी करण्यात आली. दारुचा साठा ठेवणारे, वाहतुकीचे नियम मोडणारे तसेच काही संशयितांचीदेखील पाहणी पोलिसांनी या मिशनदरम्यान केली. त्यामध्ये दारु विक्री करणारे, न्यायालयात हजर न राहणारे, दारु पिऊन वाहन चालविणारे अशा अनेकांवर रायगड पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये अलिबाग उपविभागीय अधिकारी विनित चौधरी यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या मांडवा पोलिसांनी सात हॉटेल, लॉज व रिसॉर्ट, दारु पिऊन वाहन चालविणारे तिघे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे चौघे, तसेच वॉरंट आणि समन्स बजावणी असणार्या चार जणांविरोधात कारवाई केली. पोलिसांनी 78 संशयित वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये 98 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. ऐन निवडणुकीत पोलिसांच्या मिशन ऑल आऊटमध्ये अवैध धंदे चालविणारे, बेकायदेशीरिरत्या दारु विक्री व निर्मिती करणार्यांना दणका मिळाला आहे.