ड्राईव्ह ट्रक कार्डचा गैरवापर

टेम्पोचालकासह पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल


| नागोठणे | वार्ताहर |

ड्राईव्ह ट्रक कार्डचा गैरवापर करून टेम्पोचालकाकडून आर्थिक अपहार करून फसवणूक करण्याची घटना नागोठण्याजवळील कोलेटी येथील विघ्नहर्ता पेट्रोल पंप येथे घडली आहे. आयशर टेम्पो या ब्रॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गाडीची डिझेल टाकीची क्षमता कमी असताना टाकीत जास्त डिझेल टाकल्याचे भासवून पंपावरील कर्मचाऱ्याच्या सहकार्याने सुमारे 97 हजार 500 रुपयांचा अपहार करून गाडीमालकाची व कार्ड कंपनीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी टेम्पो चालक व पेट्रोल पंपवरील एका कर्मचाऱ्याविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात वडखळ पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पोच्या मालकाने आपल्या चालकाला डिझेल भरण्यासाठी मोठ्या विश्वासाने हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचे ड्राईव्ह ट्रक कार्ड दिले होते. या कार्डचा उपयोग फक्त हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावरच डिझेल भरण्याकरिता करता येतो. त्यामुळे या गाडीच्या चालकाने कोलेटी येथील विघ्नहर्ता, पाली-सुधागड येथील यशराज पेट्रोल पंप, खालापूर येथील श्री. सिद्धीविनायक पेट्रोलपंप या पंपावर 12 सप्टेंबर, 2023 ते 31 ऑक्टोबर, 2023 दरम्यान डिझेल भरले आहे. हे डिझेल भरताना गाडीच्या डिझेल टाकीची क्षमता 60 लीटरची असताना त्यापेक्षा अधिक डिझेल भरले आहे असे दाखवून जास्त रक्कम त्या कार्डमधून देऊन पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने, दोघांच्या संगनमताने कंपनीची दिशाभूल करून मोठ्या रकमेचा अपहार केला आहे. याप्रकरणी राकेश माचीवले, रा. तांबडी-रोहा व दत्ता भिलारे, रा. भुवनेश्वर, रोहा या दोघांवर वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस करीत आहेत.

Exit mobile version